साहित्त्यव्रती, ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे ९३ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 04:24 PM2022-11-13T16:24:48+5:302022-11-13T16:26:49+5:30
उरण-केगाव येथील साहित्त्यव्रती ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे शुक्रवारी (११) वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
मधुकर ठाकूर
उरण : उरण-केगाव येथील साहित्त्यव्रती ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे शुक्रवारी (११) वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दांडा-केगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे.
उरण-केगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचा वयाच्या ९३ व्या वर्षीही साहित्याचा प्रवास अखंडपणे सुरू होता.तरुणांनाही लाजवेल अशा उत्साही या साहित्त्यव्रती साहित्यिकांचा " दोन एकर जमीन " हा शेवटचा कथा संग्रह प्रकाशित झाला होता. गजानन दर्णे यांचे १२ कथांचे हे प्रकाशित झालेले १६ वे पुस्तक पुष्प होय.
गेली ७३ वर्षाहून अधिक काळ ते सातत्याने लिखाण करीत आहेत.दै. चित्रामधून त्यांच्या गोष्टी प्रसिद्ध व्हायच्या. बाल दोस्तांसाठीही दै. नवशक्तीमधून नियमित लिखाण करायचे. त्यांच्या ‘कोळ्याचे जाळे’ या कथेवर ज्येष्ठ व्यंगचित्रकार दिवंगत हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ६२ वर्षापूर्वी चितारले होते. त्यांची आतापर्यंत कुसुम गुच्छ ,खोटी आदेली,चिमणे चंडोल, ज्येष्ठ पर्व,देवदूत, लाल्या, गणपतीच्या गोष्टी,कथा गणेशाच्या, कोळ्यांचे जाळे, महादेवाचा नंदी, चांदोबाची दिवाळी, हत्ती शाळेत जातो,दिक्षा, सुट्टीची कमाई, आणि डोंगर चालत आला,दोन एकर जमीन आदी १६ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या कथा, कवितांची संख्या बरीच मोठी आहे.ब्रेल लिपित (अंध भाषा) त्यांची ७ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. मागील ७२ वर्षाहून अधिक काळ ते सातत्याने लिखाण करीत आहेत. वयाच्या ९३ व्या वर्षी ते विविध वर्तमान पत्रांसाठी लघुकथा व इतरत्रही लिखाण सुरुच होते.
आकाशवाणी मुंबई केंद्रानेही ‘गम्मत जम्मत’ या कार्यक्रमात त्यांचे ३४ कार्यक्रम प्रसारित केलेले होते. त्यांच्या ‘ज्येष्ठपर्व’ या पुस्तकाला टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना विशेष प्रसिद्धी दिली होती. पंचक्रोशीतल्या ३४ जेष्ठांची माहिती असलेल्या या पुस्तकाला ‘डीएनए’ने वर्डस्मीत (शब्दाचे सोनार) अस म्हटलं आहे. तर दै. सामनाने त्यांना उरणचे गुणी लेखक असे संबोधले आहे. अनेकांनी त्यांना साहित्य तपस्वी म्हटलं आहे. मुंबई परळ येथे अ.भा. पत्रकार संघटनेने दामोदर नाट्यगृहात ‘साहित्यरत्न’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
दर्णेना नाटकात काम करण्याची आवड होती.त्यांनी स्थानिक पातळीवर काही नाटकातही काम केले होते.क्रिकेटची आवड असलेल्या दर्णे यांनी उरण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पदही भुषविले आहे. राष्ट्रसेवादलाचे त्यांनी काम केले आहे.काही काळ ते उरण पूर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नव्वदीनंतरही हा युवा साहित्यिक " ना कधी थकला ना कधी दमला. गजानन दर्णे यांची साहित्य सेवा नित्यनेमाने सुरुच होती.नुकताच " दोन एकर जमीन " हा कथा संग्रह प्रकाशित करुन 'अभी तक तो मैं जवान हूॅ ' ची झलक त्यांनी तरुणाईला दाखवून दिली होती. अशा या साहित्त्यव्रती गजानन दर्णे यांची एक्झिट साहित्यिकांना चटका लावणारी आहे.