नवी मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत; वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:58 PM2019-08-04T23:58:05+5:302019-08-04T23:58:20+5:30
ऐरोलीत झाडे उन्मळून पडली; भुयारी मार्गात साचले पाणी
नवी मुंबई : शहरात मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. ऐरोली नोड, घणसोली गवळीदेव डोंगर परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्याने तारा तुटण्याच्या घटना घडल्याने घणसोली, गोठीवली, तळवली, नोसिल नाका आणि ऐरोली येथे वीज पुरवठा खंडित झाला होता. तर वाशीत सेक्टर १० येथे ३ ते ४ फूट पाणी साचले होते.
ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयासमोरील उद्यानातील एक झाड, तसेच सेक्टर १५ येथील अक्षय सोसायटी आणि दक्षिण सोसायटी जवळ दोन झाडे अशी एकूण तीन झाडे उन्मळून पडली. परिसरात मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागले. ऐरोलीत झाडे उन्मळून पडल्याने अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे मशीनच्या साहाय्याने कापून वाहतुकीचा मार्ग खुला करून दिला.
कोपरखैरणे, रबाळे, घणसोली आणि ऐरोली रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गातही पाणी साचल्याने वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली होती. घणसोली गावातील चिंचआळी, ताराई नगर, कौलआळी स्मशानभूमी रोड आणि बाळाराम वाडी परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. येथील महापालिकेचे गुणानी तलाव ओसंडून वाहू लागल्याने रस्ता पाण्याखाली गेला.