नवी मुंबई : मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वाशी येथील गोल्डक्रेस्ट हायस्कूलच्या व्यवस्थापनाला सिडकोने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका सिडकोने शाळा व्यवस्थापनावर ठेवला आहे.
सिडकोने २१ डिसेंबर २०१२ रोजी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टसाठी वाशी सेक्टर २९ येथे शैक्षणिक उपक्रमासाठी भूखंड दिला आहे. या भूखंडावर ट्रस्टने गोल्डक्रेस्ट हायस्कूल सुरू केली आहे. नियमानुसार शाळेसाठी खेळाचे मैदानही देण्यात आले आहे. सिडकोच्या करारातील अटी व शर्तींनुसार शालेय वेळेनंतर सदर मैदान स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सिडकोचा हा नियम शहरातील सर्वच शिक्षण संस्थांना बांधील आहे. मात्र काही शैक्षणिक संस्था या नियमाला सपशेल हरताळ फासत असल्याचे दिसून आले आहे. गोल्डक्रेस्ट शाळेनेसुद्धा करारातील अटी व शर्तींचे उल्लंघन करीत स्थानिक मुलांना मैदानात प्रवेशबंदी केली आहे. तसेच मैदानात फुटबॉल टर्फ बांधण्यात आला आहे. हा टर्फ बांधताना सिडकोची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अमर अग्रवाल यांनी सिडकोसह मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत सिडकोने शाळा व्यवस्थापनाला २४ जानेवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र दिलेल्या मुदतीत व्यवस्थापनाकडून या नोटीसला कोणतेही उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे २४ फेब्रुवारी रोजी सिडकोच्या संबंधित विभागाने शाळेला दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.
करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी भूखंडाचा करारनामा रद्द का करू नये, अशी विचारणा या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. गोल्डक्रेस्ट शाळा व्यवस्थापनाकडून नियम व अटीचे उल्लंघन झाल्याची तक्रार कोकण भवन येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडेसुद्धा करण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रकरणी कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने सिडकोला दिल्या होत्या. सिडकोच्या संबंधित विभागाने गोल्डक्रेस्टवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत दोन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसला दिलेल्या मुदतीत संबंधित व्यवस्थापनाकडून उत्तर न आल्याने थेट कारवाई करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याचे समजते.गोल्डक्रेस्ट शाळेच्या व्यवस्थापनाने कोणतीही परवानगी न घेता खेळाच्या मैदानात फुटबॉल टर्फ बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक मुलांना मैदानात प्रवेश मिळत नाही. ही बाब सिडकोबरोबरच्या करारातील अटी व शर्तींचा भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधित व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. - करण शिंदे, व्यवस्थापक, वसाहत विभाग, सिडको