नवी मुंबई : जेएनपीए ते दिल्ली फ्रेट कॉरिडोरच्या कामासाठी मध्य रेल्वेने पनवेल येथे ३८ तासांचा मेगाब्लॉक घेऊन रूळ आणि फलाटांची कामे करून गुरुवारी चौथ्या दिवशी हार्बर मार्गावरील लोकलचा गोंधळ सुरूच होता. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. हे कमी म्हणून की रेल्वेने शुक्रवारी सकाळी कोणतीही सुचना न देता ट्रान्स हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा अचानक बंद केली. यामुळे पनवेल येथे जाणार्या प्रवाशांना ठाण्याहून बेलापूरपर्यंतच प्रवास करता येत होता. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
पनवेल येथे नवे रेल्वेरुळ टाकल्याने लोकलला गती दिल्यास अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सध्या त्यांची गती कमी ठेवली आहे. यापूर्वी प्रती तास ३० किमी वेगाने मुंबईकडे जाणारी लोकल आता प्रती तास १५ किमी धावत आहेत. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी याचपद्धतीने ठाणे मार्गावर धावणारी ट्रान्सहार्बर अचानक पनवेल ते बेलापूर या दरम्यान कोणतेही कारण न देता बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी सकाळी कामाचे ठिकाण गाठण्यासाठी बसने प्रवास केला तर अनेकांनी रिक्षातून प्रवास केला. यात रिक्षाचालकांनी संधी साधून प्रवाशांची चांगलीच लूट केली.
पनवेल येथे फलाटात केले बदलजेएनपीए ते दिल्ली फ्रेट कॉरिडोरच्या रिमाॅडलिंगमुळे मध्य रेल्वेने पनवेल रेल्वे स्थानकावरील फलाटांचे क्रमांक बदलले आहेत. नव्या बदलानुसार, जुना फलाट क्रमांक १ हा फलाट क्रमांक ३ म्हणून ओळखला जाणार असून दोन क्रमांकाच्या फलाटाचा क्रमांक तोच राहील. तसेच, जुना फलाट क्रमांक ३ हा क्रमांक १ म्हणून ओळखला जाणार आहे. शिवाय जुना फलाट क्रमांक ४ पाडून तो कायमचा बंद होणार आहे.