गळतीमुळे लोकल प्रवासी हैराण
By admin | Published: June 30, 2017 03:03 AM2017-06-30T03:03:28+5:302017-06-30T03:03:28+5:30
पावसाचे आगमन झाले असून, शहरातील लोकलसेवेला गळतीची धार लागली आहे. नवी मुंबईतील हजारो प्रवासी हार्बर, तसेच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाचे आगमन झाले असून, शहरातील लोकलसेवेला गळतीची धार लागली आहे. नवी मुंबईतील हजारो प्रवासी हार्बर, तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर रोजचा प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना पावसाळा सुरू होताच गळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने प्रशानला अनेकदा तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. निकामी खिडक्या, रेल्वेची नादुरुस्त दरवाजे, मोडक्या आसन व्यवस्था, फलाटांवरील छतांमधून गळणारे पाणी यामुळे प्रवाशांनी कसा प्रवास करायचा? असा प्रश्न नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानकांची डागडुजी करण्याविषयी सिडको आणि प्रशासनाच्या टोलवा टोलवीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, तुर्भे, घणसोली तसेच खारघर, खांदेश्वर, पनवेल आदी रेल्वेस्थानकांमध्ये लोकलची वाट पाहत उभ्या प्रवाशांना गळक्या छतांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इंडिकेटर बंद पडल्याने लोकलची वेळ कळत नसून, पावसामुळे येणारी लोकल किती मिनिटे उशिरा येणार, याबाबतही सूचना दिल्या जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकातील फलाटांवरही गळतीचे प्रमाण वाढले असून, फलाटांवर घसरून पडण्याचा प्रकार पाहायला मिळतात. रेल्वेस्थानकातील भुयारी मार्गातही पाणी साचत असून, अनेक वेळा या ठिकाणी असलेले दिवेदेखील बंद असतात.