स्थानिक खेळाडूंचा प्रवास ‘खडतर’
By Admin | Published: May 20, 2017 04:46 AM2017-05-20T04:46:32+5:302017-05-20T04:46:32+5:30
शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील खेळाच्या मैदानांवर मातीऐवजी खडी व वाळूचे थर साचले आहेत. अशा मैदानांवर खेळताना पडल्यावर गंभीर दुखापत होत असल्याने अनेकांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब राजकारण्यांच्या हितासाठी सुटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबई महापालिकेकडून एकीकडे खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत. याचा त्रास त्याठिकाणी खेळण्यासाठी
येणाऱ्या लहान मुलांसह तरुण खेळाडूंना होत आहे.
खेळासाठी राखीव असलेल्या मैदानांवर केवळ लाल मातीचा थर असणे आवश्यक आहे. त्यानुसार खेळाची मैदाने बनवताना सुरवातीला पालिकेतर्फे त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्यात देखील आलेला आहे. परंतु सुरवातीला मैदान तयार केल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यामुळे बहुतांश मैदाने असूनही ती खेळाडूंसाठी गैरसोयीची ठरत आहेत.
अनेकदा खेळाची मैदाने राजकीय सभा अथवा विविध संस्थांच्या कार्यक्रमासाठी भाड्याने दिली जातात. अशावेळी आयोजकांकडून मैदानावरील मातीची धूळ उडण्याचे थांबवण्यासाठी त्याठिकाणी वाळूचा थर टाकला जातो. नवरात्री उत्सवाच्या दरम्यान हा प्रकार सर्वच खेळाच्या मैदानांवर पहायला मिळतो. परंतु कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर जेव्हा मैदाने मोकळी होतात, तेव्हा मात्र ही मैदाने खेळण्यायोग्य राहिलेली नसतात. त्यामुळे खेळाची मैदाने कोणत्याच कार्यक्रमासाठी दिली जावू नयेत, अथवा दिल्यास आयोजकांना अटी व शर्ती लागू कराव्यात अशी अनेकांची मागणी देखील आहे. मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून खेळाच्या मैदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने अनेक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार त्यांच्या प्रभागातील खेळाच्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु सुरक्षा भिंतीची काळजी घेतली जात असतानाच, मैदानातील खडी, वाळूचे थर हटवून मातीचा थर कायम राखण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानासह कोपरखैरणेतील मैदाने पार्किंगसाठी वापरली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मुलांच्या शारीरिक वाढीसाठी मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत. परंतु नवी मुंबईतील मुलांना खेळाची मैदाने असूनही त्याचा उपभोग घेता येत नाहीये. मैदानात मातीऐवजी खडी, वाळूचे थर साचल्याने पडून जखमा होत असल्याने पर्यायी पालकांनाच मुलांच्या मैदानी खेळावर निर्बंध घालावे लागत आहेत.
पालिकेकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे, मात्र मैदानांकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीला शहरातील बहुतांश खेळाच्या मैदानांवर खडी व वाळूचे थर साचले आहेत.
शहरातल्या बहुतांश खेळाच्या मैदानावर खडी, वाळूचे थर साचले आहेत. मैदानात केवळ लाल मातीचाच थर असणे आवश्यक असतानाही तक्रार करून देखील पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्याठिकाणी खेळताना पडल्याने लहान मुलांना दुखापती होत आहेत.
-अभयचंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते