हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:59 AM2024-07-09T06:59:37+5:302024-07-09T06:59:46+5:30

बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

Local services on Harbor route disrupted from Monday morning due to heavy rains | हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे 'मेगा'हाल झाले. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे 'बेस्ट' व 'एनएमएमटी' बसथांब्यांवरही प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. हजारो प्रवाशांना कार्यालयात पोहोचताच आले नाही. अनेकांनी अर्ध्या रस्त्यातून घरवापसी करणे पसंत केले. बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान वाहतूक सुरळीत होती; परंतु वाशीवरून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा चुनाभट्टी येथे रुळावर पाणी साचल्याने सकाळी बंद केली होती. त्यामुळे वाशी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती. लोकल सेवा सुरळीत होत नसल्यामुळे प्रवाशांनी महामार्गावर जाऊन एसटी, बेस्ट व एनएमएमटीचा आधार घेतला.

एनएमटीच्या ३७० बसद्वारे वाहतूक

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमटी) ३७० बस नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली या मार्गावर धावत होत्या. मुंबईत जास्त बस पाठविण्याचे नियोजन केले होते; पण वाहतूक कोंडीमुळे जास्त बस पाठविणे शक्य झाले नाही. नवी मुंबई महानगरपालिका उपक्रमाची बस सकाळी साडेनऊ वाजता मंत्रालयाबाहेर पोहोचते; परंतु सोमवारी एक ते दीड तास उशिरा पोहोचत असल्याची माहिती एनएमएमटी प्रशासनाने दिली.

रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी

पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने हार्बर मार्गावरील पनवेल, बेलापूर, नेरूळ, वाशी रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ही सेवा पनवेलहून वाशीपर्यंतच धावत होती तर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवासुद्धा विलंबाने धावत होती.

वाशीपर्यंत लोकल सुरू होती. तेथून मुंबईत जाण्यासाठी लोकल मिळत नव्हती. बसची सुविधाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात पोहोचता आले नाही -सुधाकर माने, नेरूळ

कल्याणवरून नवी मुंबईत येतानाही तारेवरची कसरत करावी लागली. लोकल वेळेत धावत नव्हत्या. प्रचंड गर्दी होती -विजय देशमुख, कल्याण

'एनएनएमटी'च्या ३७० बस विविध मार्गावर धावत होत्या. मुंबईत वाहतूक कोंडीमुळे बस वेळेवर पोहोचत नव्हत्या. प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न केला - योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी

विरारवरून सानपाडामध्ये कार्यालयात येण्यासाठी सकाळीच निघालो होतो. बांद्रापर्यंत पोहोचलो; पण तेथून पुढे येण्यासाठी लोकल मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा घरी जाणे पसंत केले चंद्रकांत दळवी, विरार

Web Title: Local services on Harbor route disrupted from Monday morning due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.