विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:03 AM2021-06-11T07:03:03+5:302021-06-11T07:03:28+5:30

Navi Mumbai : सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

locals demand to name the airport Diba; Agitations in 4 districts | विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

Next

नवी मुंबई : नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी गुरूवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास १५ ठिकाणी मानवी साखळी केली. १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले. हजारो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी संघटित होऊन भविष्यात नामकरणासाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.

सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी आदर आहे, त्यांचे नाव राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाला देता येईल, परंतु नवी मुंबईमधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड चार जिल्ह्यांतील हजारो प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते. विमानतळाच्या जागेवर मानवी साखळीने दि. बा. पाटील यांचे नाव तयार करण्यात आले होते. प्रत्येक गावातील नागरिकांनी जबाबदारी वाटून किमान ८०० मीटरची साखळी तयार करण्याची जबाबदारी घेतली होती. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर लवकरच सिडको भवनला घेराव घालण्यात येणार आहे. याबाबत भावना तीव्र असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले. 

विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव - एकनाथ शिंदे
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल असा ठराव सिडकोने आधीच केलेला आहे असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की भविष्यात दुसर्‍या मोठ्या प्रकल्पाला ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला आधीच दिले आहे. दि.बा. पाटील  यांचा आम्ही आदरच करतो. मात्र सिडकोने त्यांचे नाव विमानतळाला देण्याचा ठराव केलेला नव्हता.

Web Title: locals demand to name the airport Diba; Agitations in 4 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.