कर्नाळ्यातील प्राणिगणनेवर लॉकडाऊनचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:09 AM2020-04-30T02:09:08+5:302020-04-30T02:09:25+5:30
भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेवर लॉकडाउनचे सावट असणार आहेत.
वैभव गायकर
पनवेल : कोविड १९ (कोरोना )या जागातील साथीच्या आजाराने सध्याचे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेवर लॉकडाउनचे सावट असणार आहेत.
विशेषत: वन्यप्रेमी, सेवाभावी संस्था (एनजीओ ) हे या प्राणिगणनेत वनविभागाला सहकार्य करीत असतात. मात्र, लॉकडाउनमुळे वन्यप्रेमींना या प्राणिगणनेपासून यावेळी वंचित राहावे लागणार आहे. यावर्षी ७ मे रोजी बौद्धपौर्णिमा आहे. मात्र, महाराष्ट्रातील लॉकडाउन पुढे ढकलला जाणार असल्याने यावर्षी प्राणिगणना होईल की नाही? याबाबत देखील शाशकंता निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. जिल्ह्याला यापूर्वीच रेड झोन घोषित केल्याने वनविभागाला या प्राणिगणनेत या परिसरातील सेवाभावी संस्थांची मदत मिळणार नाही, हे निश्चित मानले जात आहे. १२.१५५ चौरस किलोमीटरच्या या अभयारण्य परिसरात सुमारे १४७ प्रजातीचे पक्षी राहतात. यात ३७ स्थलांतरित प्रकारच्या दुर्मीळ पक्ष्यांचा देखील समावेश आहे. यासह हिंस्त्र अशा वन्यजीवांचा वावरदेखील याठिकाणी आहे. बौद्धपौर्णिमेला पूर्ण चंद्र असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत रात्री चंद्राचा प्रकाश जास्त असतो. रात्री पाणवठे आदी ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी आल्यावर ते वनविभागाने लावलेल्या नाईट मोड कॅमेºयात सहज कैद होतात. बौद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ७ ते दुसºया दिवशी सकाळी ७ अशा २४ तासांत ही पक्षी-प्राण्यांची गणना होते. मागील वर्षी कर्नाळा अभयारण्यात ३७ विविध प्रजातीच्या प्राणी पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. या गणनेत बिबट्या मात्र कॅमेºयात मागील वर्षी कैद झाला नव्हता. बिबट्याचा वावर अभयारण्यात असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
या प्राणिगणनेत दरवर्षी स्थानिक आदिवासी बांधव तसेच ग्रामस्थांची मदत घेतली जाते.मात्र लॉकडाउनमुळे वनविभागाला स्थानिकांची मदत देखील घेता येणार नसल्याने यावर्षी प्राणिगणना होणार की नाही? असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.
>दुर्मीळ वन्यजीवांचे होऊ शकते दर्शन
लॉकडाउनमुळे कर्नाळा अभयारण्य परिसरातील मानवी वावर, वाहनांची रेलचेल थांबल्याने अभयारण्यातील प्राण्यांचा मुक्तसंचार या ठिकाणी वाढला आहे. वन्यजीवांची गणना झाल्यास दुर्मीळ प्राण्यांची छबी कॅमेºयात कैद होण्याची शक्यता आहे.
>बौद्धपौर्णिमेला होणाºया प्राणिगणनेबाबत आम्हाला अद्याप वरिष्ठांचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. ३० एप्रिलपर्यंत आम्ही आदेशाची वाट पाहणार आहोत.
-पी. पी. चव्हाण,
वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य