Lockdown: नवी मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याचे आव्हान; एपीएमसी सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:08 AM2020-07-04T01:08:40+5:302020-07-04T01:08:53+5:30
अनधिकृत फेरीवाल्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
नवी मुंबई : कोरोनाचे सुरू असलेले थैमान थांबविण्यासाठी संपूर्ण नवी मुंबईमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असले, तरी प्रत्यक्षात याची कडक अंमलबजावणी होणार का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पोलीस व मनपा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही, तर लॉकडाऊनचा फज्जा उडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी पालिका व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली नव्हती. पामबीच रोड व मुख्य चौकात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते, परंतु अंतर्गत रोडवर पेट्रोलिंग केले जात नव्हते. परिणामी, नागरिक विनाकारण घराबाहेर पडत राहिले व रुग्ण वाढले. शनिवारपासून पुन्हा दहा दिवस अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद केली जाणार आहेत, परंतु सद्यस्थितीमध्ये शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच नवी मुंबईमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवरही कडक कारवाई होत नाही. पुढील दहा दिवसांत काटेकोरपणे अंमलबजावणी केली, तरच कोरोना नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.
एपीएमसी सुरूच राहणार
एपीएमसी मार्केटमध्ये रोज २० ते २५ हजार नागरिक नोकरी, व्यवसाय, खरेदीसाठी येत आहेत. मार्केटमुळे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. यामुळे एपीएमसी सुरू ठेवून उर्वरित शहर बंद ठेवण्यात काहीही अर्थ नाही. एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी ही बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले, तरच या उपाययोजनांना यश येणार आहे. नियमांचे पालन केले नाही, तर रुग्णसंख्या झपाट्याने वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
10,000 च्या दिशेने वाटचाल
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन दोनशेपेक्षा जास्त वाढ होत आहे. ही वाढ थांबविली नाही, तर जुलै अखेरपर्यंत नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारांपेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने आता शासन व महानगरपालिकेवर अवलंबून न राहता, स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.