Lockdown News: मद्य, सिगारेटचा काळाबाजार सुरूच; लॉकडाउन वाढल्याने भावही वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:24 PM2020-05-03T23:24:15+5:302020-05-03T23:24:23+5:30
शहरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ व सीबीडी-बेलापूर या भागात अशाप्रकारची अवैध मद्यविक्री तेजीत सुरू आहे.
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मद्यविक्री व पान, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांचा काळाबाजार तेजीत आला आहे. विशेष म्हणजे, लॉकडाउनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढल्याने बंदी असलेल्या मद्यासह तंबाखूजन्य पदार्थांच्या काळाबाजारातील किमतीही वधारल्याचे दिसून आले आहे. काही संधीसाधूनी याचा फायदा घेतला असून विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची छुप्या पद्घतीने अवास्तव दराने विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे.
लॉकडाउनमुळे तळीरामांची चांगलीच कोंडी झाली आहे. तसेच बिडी, सिगारेट व तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांचीसुद्धा मोठी गैरसोय झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून काहींनी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू केला आहे. ६00 ते १२00 रुपये दरम्यान मिळणारी दारूची एक बाटली आता चक्क पाच ते सात हजार रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे, पहिल्या लॉकडाउनमध्ये हीच बाटली २५00 ते ३000 रुपयांना विकली जात होती. वाईन शॉप्सचे चालकच हा गोरखधंदा करीत असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही ब्रॅण्डची दारू घेतली तरी किंमत पाच ते सात हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. नेहमीच्या ग्राहकांना हे विक्रेते मोबलाइवरून संपर्क साधतात. सध्याच्या परिस्थितीत तळीरामांसाठी दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे विक्रेते मागेल ती किमत देऊन अनेक जण दारूची खरेदी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ व सीबीडी-बेलापूर या भागात अशाप्रकारची अवैध मद्यविक्री तेजीत सुरू आहे.
मोठ्या प्रमाणावर तंबाखूची अवैध विक्री मद्यविक्री प्रमाणेच सिगारेट व तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जात आहे.
150 रुपयांचे सिगारेटचे एक पाकीट आता 400 रुपयांना विकले जात आहे.
10 रुपयांना मिळणारी तंबाखूची पुडी 70 रुपयांना विकली जात आहे.
या अवैध व्यवसायाला अनेक ठिकाणी पोलिसांचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.