Lockdown News: पनवेल रेल्वेस्थानकातून २,४०० परप्रांतीयाची स्वगृही रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:10 AM2020-05-08T02:10:09+5:302020-05-08T02:10:18+5:30
बिहार, मध्यप्रदेशसाठी विशेष रेल्वे : ४३ दिवसांपासून लॉकडाउनमध्ये अडकले होते नागरिक
अलिबाग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे परराज्यातील मजूर विविध राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातही मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत. बिहार आणि मध्यप्रदेश राज्यातील तब्बल दोन हजार ४०० नागरिकांना पनवेलहून दोन विशेष रेल्वेने बुधवारी रात्री उशिरा रवाना करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू होती, त्याचप्रमाणे एमआयडीसीमध्येही लाखोंच्या संख्येने कामगार, मजूर काम करत आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडॉउन सुरू करण्यात आला आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने परराज्यातील नागरिक अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी परत जायचे होते. यासाठी त्यांची मागणी जोर धरत असल्याने सरकारला निर्णय घ्यावा लागला. दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशला एक विशेष रेल्वे पनवेलहून सोडली. त्यामध्येही एक हजार २०० नागरिकांचा समावेश होता. बुधवारी रात्री उशिरा पनवेलहून दुसऱ्यांदा विशेष रेल्वे बिहार राज्यातील दानापूर येथे पाठवण्यात आली. तसेच रात्री १२ वाजता मध्यप्रदेश्मधील हबीहगंज या ठिकाणी तिसरी रेल्वे सोडण्यात आली. त्यामध्येही एक हजार २०० मजूर होते. तब्बल ४३ दिवसांनी स्वत:च्या राज्यात, घरी जायला मिळत असल्याने आनंद व्यक्त केला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र गिद्दे, तहसीलदार अमित सानप आदी उपस्थित होते.
सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा या राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पुढील समन्वयाबाबतचे नियोजन केले आहे. अशाच प्रकारे मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा या राज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेल्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येणार आहे. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. रेल्वेने जाणाºया या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहेत.