Lockdown News: मजुरांच्या स्थलांतराचा फटका; शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:04 AM2020-05-08T02:04:24+5:302020-05-08T02:04:34+5:30

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार

Lockdown News: Labor migration hits; Work on the city's metro project stalled again? | Lockdown News: मजुरांच्या स्थलांतराचा फटका; शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प?

Lockdown News: मजुरांच्या स्थलांतराचा फटका; शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम पुन्हा ठप्प?

Next

कमलाकर कांबळे 
 

नवी मुंबई : लॉकडाउनमुळे सिडकोचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठप्प पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला अलीकडेच सुरुवात करण्यात आली आहे; परंतु शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पाला मात्र मजुरांअभावी खीळ बसली आहे. संबंधित कंत्राटदारांना मजूर मिळत नसल्याने सुरू केलेले काम पुन्हा बंद करण्याची नामुष्की सिडकोवर ओढावली आहे.
बेलापूर ते पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम कंत्राटदारांतील वादामुळे सहा वर्षांपासून रखडले होते. मात्र, सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी रखडलेल्या कामाला गती दिली आहे. कंत्राटदारांचा वाद संपुष्टात आणून नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली.

वर्षभरापासून कामाला गती दिल्याने प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दहा टक्के कामे तातडीने पूर्ण करून डिसेंबर २०२० पर्यंत या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे; परंतु लॉकडाउनमुळे या कामाला खीळ बसली आहे. लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याने अलीकडेच प्रकल्पाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती; परंतु मजूर मिळत नसल्याने चार-पाच दिवसांपासून काम ठप्प आहे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे, यादृष्टीने केंद्र शासनाने सकारात्मक धोरण घेतले आहे. याचा परिणाम म्हणून नवी मुंबईसह पनवेल परिसरातून शेकडो मजुरांनी स्थलांतर केले आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. उर्वरित कामे हातावेगळी करून डिसेंबर २०२० पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार लॉकडाउनमध्येही सोशल डिस्टन्सचे नियम पाळून प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. सुमारे २०० मजुरांचा फौजफाटा कामासाठी तैनात ठेवण्यात आला होता; परंतु या सर्वांना मूळ गावी परतण्याचे वेध लागल्याने प्रत्येक जण स्थलांतराचा अर्ज भरण्यासाठी धावत असल्याने कामगारवर्गाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून मेट्रोचे काम बंद पडल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाने दिली.

डेडलाइन पुन्हा हुकणार?
मेट्रोच्या ट्रॅकचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु विविध कारणांमुळे स्थानकांचे काम रखडले आहे. त्याशिवाय आणखी काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. ही सर्व कामे पुढील पाच-सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा सिडकोचा निर्धार आहे. कोरोनाचे सावट ओसरल्यानंतरसुद्धा मजूर लगेच परत येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे मेट्रोची डेडलाइन पुन्हा हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहे. त्यामुळे मेट्रोसह सिडकोच्या विविध प्रकल्पांना मजुरांचा तुटवडा भासत आहे. मागील दोन दिवसांत मेट्रो प्रकल्पातील अनेक मजुरांनी स्थलांतर केल्याने कामाची गती मंदावली आहे. तरीही पुढील काळात कामाला गती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. - लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: Lockdown News: Labor migration hits; Work on the city's metro project stalled again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो