नवी मुंबई : दारूची दुकाने उघडणार असल्याचे वृत्त पसरल्याने सोमवारी सकाळपासून तळीरामांनी दारूच्या दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी दुकानासमोर गर्दी वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र संध्याकाळपर्यंत दारूची दुकाने न उघडल्याने तळीरामांचा हिरमोड झाला.
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून राज्य सरकारने काही नियम व अटी शिथिल केल्या आहेत. त्यानुसार अटी व शर्तीच्या आधारे तिन्ही झोनमध्ये सोमवारपासून दारूची दुकाने उघडण्याची अनुमती दिली आहे. परंतु नवी मुंबईतील मद्य विक्रीची दुकाने उघडणार नाहीत, असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रविवारी रात्रीच स्पष्ट केले होते. त्यानंतरसुद्धा सोमवारी शहरातील मद्यविक्रीच्या दुकानांसमोर दारू खरेदीसाठी रांगा लागल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरूळ, बेलापूर आदी ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर तळीरामांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. सीबीडी येथील एका वाइन शॉपसमोर लांबच्या लांब रांग लागली होती. विशेष म्हणजे अनेक दुकानांसमोर सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसून आले.