Lockdown News: तिकिटासाठी प्रतिव्यक्ती ७०० रुपये आकारणी; स्थलांतरित मजूर मध्यप्रदेश, बिहारकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:06 AM2020-05-09T02:06:26+5:302020-05-09T07:19:50+5:30
पोलिसांच्या भीतीने पायी जाणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकच्या वापर करून मार्गक्रमण करीत आहेत
वैभव गायकर
पनवेल: राज्यात लॉकडाउनच्या काळात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी विशेष ट्रेन केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकातून मध्यप्रदेश व बिहारला ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या मजुरांकडून प्रत्येकी ७०० रुपये रेल्वे भाडे आकारले जात असल्याने बेरोजगार कामगारांना आर्थिक भुर्दंड सहन करावे लागले. त्यामुळे कामगारांच्या मोफत प्रवासाची चर्चा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
कामगारांकडून कोणत्याही पद्धतीच्या प्रवासी भाड्याची आकारणी होणार नाही, अशा घोषणा एकीकडे होत असताना अनेक दिवसांपासून बेरोजगार असलेल्या मजुरांकडून प्रत्येकी ७०० रुपये भाड्याची आकारणी केली जात असल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. पनवेलमधून अद्यापपर्यंत बिहारला एक व मध्यप्रदेशला दोन अशा तीन विशेष ट्रेन रवाना झाल्या आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये १२०० असे एकूण ३६०० स्थलांतरित मजूर मूळ गावी रवाना झाले आहेत. या कामगारांमध्ये पनवेलसह रायगड तसेच नवी मुंबई परिसरातील कामगारांचा समावेश आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांकडे नोंदणी केल्यानंतर या कामगारांना आपल्या गावी जाण्याची संधी मिळाली. अद्यापही हजारो कामगार आपल्या गावी जाण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत. यामध्ये आरोग्य तपासणी, पोलिसांकडे नोंदणी आदी प्रक्रिया सुरू आहेत. बरेचसे कामगार हे कार्यरत असलेल्या साइटवर अडकून पडले होते. सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांकडून या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
महापालिकेने स्थापन केलेल्या निवारा केंद्रात सध्याच्या घडीला केवळ ७६ नागरिक थांबले आहेत. पनवेल परिसरातून हजारोंच्या संख्येने नागरिक यापूर्वीच पायी गावी गेले आहेत. याची ठरावीक नोंद स्थानिक प्रशासनाकडे नसली तरी पाच हजारांपेक्षा जास्त नागरिक कोकण, कर्नाटक आदीसह विविध राज्यात या ठिकाणाहून पायीच गावी गेले आहेत.
पोलिसांच्या भीतीने पायी जाणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकच्या वापर करून मार्गक्रमण करीत आहेत. औरंगाबाद येथील मजुरांचा दुर्दैवी अंत झाला असून, पनवेल परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर बंदोबस्ताची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा या ठिकाणीही अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. कामगारांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जेवण, मास्क, बसची व्यवस्था आदी रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली.
पनवेलमधून सुटलेल्या गाड्या
पनवेल ते बिहार
पनवेल ते मध्यप्रदेश (दोन गाड्या)
आमच्याकडून बसमधून उतरताच क्षणी प्रति व्यक्ती ७०० रुपये आकारणी करण्यात आली. बसमधील कामगारांचे 50600 रुपये जमा करून रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. - बलराम ठाकूर, स्थलांतरित मजूर, बिहार