- अरुणकुमार मेहत्रे ।
कळंबोली : हातावर पोट असणाºया कामगाराबरोबरच गणेशमूर्ती साकारणाºया मूर्तिकारांनाही कोरोनाची झळ सोसावी लागत आहे. गणेशोत्सवाला जेमतेम तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाचा श्री गणेशा झालेला नाही.
लॉकडाउनमुळे गुजरातमधून येणारा कच्चा माल येण्यास विलंब होत आहे. रेड झोन वगळता अन्य ठिकाणी लॉकडाउनची नियमावली शिथिल करण्यात आली असली तरी व्यावसायिकांकडे कच्चा मालच उपलब्ध होत नसल्याने पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मूर्तिकारांनाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या तीन-चार महिने आधी मूर्तिकार कामास सुरुवात करतात. यंदाचा गणेशोत्सव २२ आॅगस्टला सुरू होणार आहे; परंतु मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालच कारागिराकडे नाही. शाडूची माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, मातीमध्ये मिसळण्यासाठी काथ्या हा कच्चा स्वरूपातील माल गुजरात व राजस्थान येथून मागवला जातो. त्याचबरोबर लागणारे रंग मुंबई येथून आणले जाते. या कामाला दरवर्षी एप्रिलपासूनच सुरुवात होते; परंतु यंदा मूर्ती तयार करण्यासाठी हाताशी कच्चा माल नाही. सध्या जवळ असलेल्या मातीतूनच मूर्ती साकारल्या जात असल्या तरी ती संख्या कमी आहे.
दरवर्षी पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बनवल्या जातात. कुंभारवाडा, भिंगारी येथे गणेशमूर्तींच्या १० कार्यशाळा आहेत. या ठिकाणी बारा महिने काम चालते. कच्चा माल पेण तालुक्यातून आणला जातो.
च्कुंभारवाडा येथे ३ तर भिंगारी येथे ७ कारखाने एकाच ठिकाणी आहेत. दरवर्षी ५ हजारापेक्षा जास्त लहान-मोठे मूर्तींची विक्री केली जाते. त्यातून ४० लाखांचा व्यवसाय केला जातो. यंदा कोरोनाचे संकट ओढावल्याने आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडल्याचे मूर्तिशाळेचे मालक केतन मांगरुळकर यांनी सांगितले.
कामगारांचाही तुटवडा
1. शाडू आणि पीओपीच्या मूर्ती घडविणारे कारागीरही कोरोनाच्या धास्तीने गावी गेले आहेत. त्यामुळे काम करण्यास कारागीर मिळत नाहीत. त्यातच रंग, ब्रश यासारखे व्यवसायाशी निगडित अनेक वस्तूंची बाजारपेठही बंद आहेत. मूर्तीच्या आॅडर्सही मूर्तिकारांकडे नाहीत. यंदा गणेशोत्सवाची तयारी काहीच नसून प्रत्येक जण कोरोनाशी सामना करत असल्याने गणेशोत्सवावरही सावट असण्याची शक्यता मूर्तिकारांकडून वर्तवण्यात येत आहे.
यंदा मोठ्या गणेशमूर्ती नाहीच
2. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा मोठ्या गणेशमंडळांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश मंडळासाठी लागणाºया मोठ्या मूर्ती तयार न करण्याचा निर्णय कारागिरांनी घेतला आहे. जो शिल्लक कच्चा माल आहे, तोच छोट्या, घरगुती गणपती बनविण्यासाठी वापरला जाणार आहे.