पनवेलमधील लॉजवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2016 03:05 AM2016-07-07T03:05:34+5:302016-07-07T03:05:34+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पनवेलमधील नारपोली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पनवेलमधील नारपोली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली.
पनवेलमधील नारपोली येथील भूषण लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. अनेक महिन्यांपासून त्याठिकाणी हा गैरप्रकार सुरू होता. यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, महिला उपनिरीक्षक रुपाली पोळ, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार सापते, पाटील आदींच्या पथकाने सदर लॉजवर कारवाई केली. सदर लॉजमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्यांनी त्याठिकाणी सुरु असलेल्या गैरप्रकाराची खात्री पटवली. यावेळी लॉजमध्ये महिला पुरवल्या जात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी दोन महिलांची सुटका करून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये बार मालकासह मॅनेजर व दलालांचा समावेश आहे. प्रशांत पुजारी, अवधेश चतुर्वेदी, गिरीधर अधिकारी व प्रशांत हेगडे अशी
त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)