नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने या काळात राज्यांकडून चालवण्यात येत असलेल्या बँका तसेच वित्तीय संस्था, सर्व सरकारी बँका यांच्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन तसेच बदल्यांना परवानगी दिली असली तरी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना प्रक्रिया पार पडेपर्यंत इतर ठिकाणी बदली करण्यास मनाई केली आहे.
याबाबत आयोगाकडून अर्थ मंत्रालयाला सूचना दिल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात बँकांच्या अधिकाऱ्यांचे प्रमोशन तसेच बदल्यांवर आयोगाला कोणताही आक्षेप नसेल परंतु निवडणुकीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना कुठेही अन्यत्र हलविता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एलआयसी, ग्रामीण बँका, कर्जवसुली लवाद तसेच सरकारी वित्तीय संस्थांना आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत कळवले आहे.