श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
By नारायण जाधव | Published: May 2, 2024 05:04 AM2024-05-02T05:04:39+5:302024-05-02T05:07:57+5:30
सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती.
नारायण जाधव
नवी मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार हे कोडे अखेर सुटले असून, शिंदेसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच ताब्यात ठेवून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना शह दिला आहे. मात्र, येथून त्यांनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. डोंबिवलीतील स्वयंसेवकांसह रवींद्र चव्हाण समर्थकही श्रीकांत यांच्यावर नाराज होते. भाजपच्या मुस्लीम विरोधामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातील मुस्लिमांची एकगठ्ठा मते यावेळी मिळतील की नाही, याबाबत शिंदे साशंक आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करून ठाण्यासाठी शिंदेंवरील दबाव वाढविला होता.
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून सध्या राजकारणापासून दूर असलेल्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक बुचकळ्यात पडले. दरेकर यांना ठाकरेंनी उमेदवारी काेणत्या आधारे दिली, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला होता. त्याचे उत्तर एकनाथ शिंदेंनी ठाण्यातून गणेश नाईकांसारख्या प्रभावी नेत्यास शह देत भाजपचा विरोध डावलून ठाण्याच्या महत्त्वाच्या जागेवर नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यावर मिळाले आहे. ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जागेवर आनंदनगरचे माजी नगरसेवक असलेल्या म्हस्केंना उमेदवारी देण्यामागे श्रीकांतच्या कल्याणासाठी उद्धवसेनेसोबत तह करून विचारेंना बाय दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाणे सोडल्यास नवी मुंबई, मीरा-भाईंदर या ठिकाणी म्हस्के यांचा प्रभाव नाही. त्यांना असलेल्या मर्यादा पाहता ही निवडणूक विचारेंना आता सोपी जाऊ शकते.
संजीव नाईकांचा प्रचार गेला वाया
नरेश म्हस्के यांची राजकीय कारकिर्द पाहता स्वीकृत नगरसेवक, सभागृह नेते, महापौर अशी चढती राहिली आहे. यंदाच्या लोकसभेसाठी म्हस्के यांच्यासोबतच आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे चर्चेत होती, तर भाजपकडून आधी विनय सहस्रबुद्धे, संजय केळकर यांच्यासह नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार संजीव नाईक इच्छुक होते. संजीव नाईक यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला प्रचार सुरू केला होता. विशेषत: ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरांत त्यांच्या प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण झाली होती.
शिंदेसेनेस होती नाईकांची भीती
भाजपच्या सर्वेक्षणात उद्धवसेनेच्या राजन विचारेंना संजीव नाईक हेच टक्कर देऊ शकतात, असे उघड झाल्याने नाईक यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला होता. मात्र, नवी मुंबईतील नाईक कुटुंबीयांतील सदस्य खासदार म्हणून निवडून आल्यास ठाण्यात भाजपची ताकद आणखी वाढेल, शिंदेसेना कमजोर होईल, अशी भीती शिंदे समर्थकांना होती.
ठाण्यासह नवी मुंबईतील विजय चौगुले, विजय नाहटा यांनीही ही बाब शिंदेंच्या कानावर बिंबवली होती. कारण नवी मुंबई या बालेकिल्ल्यासह ठाणे, मीरा-भाईंदर पट्ट्यात नाईकांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय गणेश नाईक यांचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहापूर, मुरबाडसह पालघरमध्ये अनेक चाहते आहेत.