नवी मुंबई : सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या पदाची सूत्रे चंद्र यांना सुपूर्द केली.गेल्या आठवड्यात भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर गुंतवणूक आणि राजशिष्टाचार विभागाचे सचिव लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार चंद्र यांनी गुरुवारी सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर उपस्थित होते. दरम्यान, सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर दुपारच्या नंतर लोकेश चंद्र यांनी सीबीडी येथील सिडको भवनमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली.लोकेश चंद्र हे १९९३ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून त्यांनी एम.टेक व बी.ई. सिव्हिल या पदवी संपादित केल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.तसेच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक, गृहमंत्रालयात खासगी सचिव व केंद्रीय पोलाद मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
लोकेश चंद्र यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:55 AM