लोकमत इफेक्ट - वसतिगृहात नवीन गृहपालांची नियुक्ती, विद्यार्थ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:45 AM2018-10-01T03:45:09+5:302018-10-01T03:45:32+5:30
गोंधळपाड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून चोवीस तासांत कारवाई
अलिबाग : तालुक्यातील गोंधळपाडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात महिला गृहपालांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. याबाबत जिल्हाधिकाºयांनी त्वरित कारवाई केली आहे. महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून त्यांच्या जागी समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली होती. शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच रायगड जिल्हा समाज कल्याण कार्यालयात एकच धावपळ उडाली होती तर सहायक समाज कल्याण आयुक्त रविकिरण पाटील सकाळीच वसतिगृहात पोहोचले.
महिला गृहपाल एम. जे. नरहरे गेल्या चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र, मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे आणि मुलांच्यारूममध्ये जाऊन त्यांना मारहाण करणे, मुलांना वसतिगृहातून काढून टाकणे आदी प्रकारे सातत्याने मुलांना त्रास देत होत्या. वसतिगृहातील मुलांनी याबाबत समाज कल्याण अधिकाºयांना भेटून अनेक निवेदने दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही गेल्या चार वर्षांत झाली नव्हती. अलीकडे महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून मुलांना त्रास अधिक प्रमाणात वाढल्याने, त्रस्त झालेल्या ४० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी डॉ.सूर्यवंशी यांनी या मुलांच्या तक्रारी व प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेऊन, चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास या सर्व मुलांना दिला होता.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त रविकिरण पाटील यांना आपल्या कार्यालयात तातडीने बोलावून घेऊन मुलांना होणाºया त्रासाबाबत विचारणा करून महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून तत्काळ पुरुष गृहपाल नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आमच्या समस्येची अत्यंत काळजीने दखल घेऊन केवळ २४ तासांच्या आत महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्ती
केल्याबद्दल सर्व मुलांनी आनंद व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आभार मानले.