नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील विविध शाळांमधील उल्लेखनीय नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यासाठी विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत’ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १३ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. या पुरस्काराच्या माध्यमातून नवी मुंबईतील ४५ शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी भावे सभागृह तुडूंब भरले होते.भावी पिढीला घडविण्याचे काम करणाºया शिक्षकांच्या कार्याचा सन्मान तसेच शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. नवी मुंबई शहरातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात पहिल्यांदाच या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सुमारे ४५ शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. शाळांच्या कमिटीशी संपर्क साधून शाळांच्या कमिटीने सुचविलेल्या शिक्षकांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शाळांमधील आवडत्या शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर शाळांमधील विद्यार्थ्यांचे डान्स आणि पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. या वेळी विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक विजय नाहटा, कार्याध्यक्ष विठ्ठल मोरे, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. मोहंती, व्ही टू सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक राज जी. ठक्कर, रौनक अॅडव्हर्टायझिंगचे संचालक अमरदीप सिंग व्हिग, अभिनेता विजय पाटकर, अभिनेता जयवंत वाडकर, एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार, वेलनेस अॅण्ड कॉर्पोरेटच्या ट्रेनर रिचा भार्गव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.सविस्तर छायाचित्रे उद्याच्या अंकात
उत्साहात रंगला ‘लोकमत’ आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:49 AM