लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात शेडच्या प्रतीक्षेत असलेल्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना तात्पुरती का होईना शेड मिळाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात शेड नसल्याची बातमी 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर खासदारांनी भेट घेऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारला होता.
बदलापूर रेल्वे स्थानकात विकासकामे सुरू असताना फलाटावर नवीन शेड उभारण्यात येणार होती. ते काम संथगतीने सुरू राहिल्याने पावसाळ्यात ते काम पूर्ण होऊ शकले नाही. पावसाळ्यापूर्वी शेडचे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते काम अर्धवट राहिल्याने पावसाळ्यात प्रवाशांना छत्री घेऊन स्थानकात उभे राहावे लागत होते. याबाबत 'लोकमत' मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पाठोपाठ नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनीही रेल्वे स्थानकाला भेट देत प्रशासनाला शेडचे काम करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आता रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाटावर असलेल्या अर्धवट शेडमुळे गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करत तर पावसाळ्यात भिजत लोकलची वाट पाहत उभे राहावे लागत होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनिर्वाचित खासदार म्हात्रे यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
प्रलंबित कामे पूर्ण कराबदलापूर रेल्वेस्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी होम प्लॅटफॉर्मच्या संथगतीने कामासह अन्य कामात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
गैरसोय दूर करण्याचे आश्वासनतांत्रिक अडचणी असलेली कामे वगळता इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात ज्या ठिकाणी अर्धवट शेड होत्या त्याठिकाणी तात्पुरती शेड उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.