नवी मुंबई : आकर्षक राेषणाई, थुईथुई नाचणाऱ्या फाउंटनच्या पाण्याचा मंजुळ आवाज, लोकमत महाराष्ट्रीयन गीताची दमदार धून आणि विविध क्षेत्रांतील मातब्बर मान्यवरांच्या शुभेच्छांनी महापेच्या लोकमत भवनावरील संध्याकाळ न्हाऊन निघाली होती.महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीने रविवारी रौप्य महोत्सवी पदार्पण केले. याचे औचित्य साधून लोकमत समूहाने नवी मुंबईतील महापे प्रेसवर शुक्रवारी संध्याकाळी एका खास समारंभाचे आयोजन केले होते. उत्तम भोजन आणि महाराष्ट्राच्या विकासावर विविध मान्यवरांशी गप्पा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. शुभेच्छा देण्यासाठी आणि या गप्पात सामील होण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, संपादकीय संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक अतुल कुलकर्णी यांनी केले.
टीव्हीच्या छोट्या पडद्यावर परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राजकीय नेते येथे परस्परांना टाळी देत, मनमुराद हसत, गप्पाटप्पा करीत होते. प्रशासनातील अधिकारी प्रोटोकॉलचे अवडंबर दूर ठेवून एकमेकांची ख्याली खुशाली विचारत होते. रंगीबेरंगी फुगे सोडून व केक कापून या ऐतिहासिक क्षणाचा गोडवा अधिकच गोड केला गेला.
- लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी लोकमतच्या मुंबईतील कारकिर्दीचा आढावा घेतला. स्व. जवाहरलाल दर्डा यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी अथक मेहनतीने साकार केले, असे गाैरवाेद्गार त्यांनी काढले.
- दर्डा कुटुंबातील पुढील पिढीचे सदस्य देवेंद्र, ऋषी व करण दर्डा हे वृत्तपत्र, डिजिटल माध्यमात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत असल्याचे विजय दर्डा यांनी आवर्जून सांगितले.
- लोकमतच्या फोर-सी ॲपची न्यूयॉर्क टाइम्सनेही दखल घेतल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या समारंभात, मुंबई लोकमतच्या ‘यंदा कर्तव्य आहे’ मोहिमेचे सादरीकरण झाले.