ठाणेचा गड राखण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या मैदानात
By नामदेव मोरे | Published: May 13, 2024 01:33 PM2024-05-13T13:33:14+5:302024-05-13T13:33:43+5:30
मुंबई बाजार समितीमध्ये रॅली : व्यापाऱ्यांसह कामगारांनाही आवाहन
नवी मुंबई : ठाणे चा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या ही प्रचाराच्या रणांगणात उतरल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये रॅली काढून व्यापाऱ्यांसह कामगारांनाही मतदानाचे आवाहन केले आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. वाटाघाटीमध्ये अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळविण्यात शिंदेसेनेला यश आले असून आता या जागेवर विजय मिळविण्यासाठी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यभर प्रचारासाठी जावे लागत असल्यामुळे ठाणे मतदार संघात मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे प्रचारामध्ये लक्ष देत आहेत. सोमवारी पहाटे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये रॅली काढण्यात आली. व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्याशी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी नवी मुंबई शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पाटकर, शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा प्रमुख मिलींद सुर्याराव, माजी नगरसेवीका शुभांगी पाटील, सरोज पाटील, शीतल सुर्यकांत कचरे, दमयंती आचरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन १ लाख नागरिकांची ये - जा सुरू असते. यामुळे निवडणुकीत बाजार समितीला विशेष महत्व प्राप्त होत असते. शिंदे सेनेनेही बाजार समितीवर लक्ष केंद्रीत केले आहे.