नवी मुंबई : नवी मुंबई शहर वसविताना सिडको महामंडळाने स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला असून विविध प्रलंबित बाबी पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवी मुंबई ९५ गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि इतर संलग्न संस्था यांच्या माध्यमातून मंगळवारी १७ मार्च रोजी पनवेल ते आझाद मैदान लॉँग मार्च काढून मंत्रालयावर धडक दिली जाणार असल्याची माहिती शुक्र वारी १३ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश ठाकूर यांनी दिली.
मुंबई शहरात नागरिकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. शहराची निर्मिती करताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या, परंतु त्या जमिनीचा मोबदला अद्याप पूर्णपणे मिळालेला नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांना अन्याय सहन करावा लागत असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली.
प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त संघटना एकत्र आल्या असून समाजाची ताकद वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाच्या माध्यमातून सुमारे २१ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक गावामध्ये विस्तारित गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे. तसेच त्या जमिनींवरील बांधकामे संरक्षित व नियमित करण्यात यावीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये, सिडकोची क्लस्टर योजना रद्द करून त्याऐवजी स्वयंविकास योजना प्रस्तावित करण्यात यावी, साडेबारा टक्के योजनेतील बेकायदेशीररीत्या राखून ठेवलेले पावणेचार टक्के जागा शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, एस.ई.झेड.मधील जमिनींचा वापर न झाल्याने त्या परत देण्यात याव्यात, नैना प्रकल्प रद्द करावा, नवी मुंबई क्षेत्रात दोन महापालिका असल्याने या क्षेत्रातून सिडको महामंडळ बरखास्त करणे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. याबाबत शासनाने निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला सुरेश पवार, वामन शेळके, विजय गडगे, दीपक पाटील, निग्रेश पाटील, आर.बी. घरत, दशरथ भगत आदी विविध प्रकल्पग्रस्त संघर्ष समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १७ मार्च रोजी पनवेलहून लॉँग मार्च प्रस्थान होणार असून १८ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले जाणार आहे.