आयुक्तांची प्रत्येक कामावर करडी नजर
By Admin | Published: May 10, 2017 12:24 AM2017-05-10T00:24:55+5:302017-05-10T00:24:55+5:30
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी एनएमएमटी, मलनि:सारण केंद्रासह सर्व प्रकल्पांना अचानक भेट देवून माहिती घेण्यास सुरवात केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी एनएमएमटी, मलनि:सारण केंद्रासह सर्व प्रकल्पांना अचानक भेट देवून माहिती घेण्यास सुरवात केली आहे. रस्ते व इतर विकासकामांना मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरवात केली असून शहरातील विकासकामांवर स्वत:ची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशाचा काटेकोरपणे त्यांच्याच हितासाठी वापर झाला पाहिजे यासाठी विकासकामांचे नियोजन करताना आयुक्तांनी विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. आवश्यक तीच कामे करण्यावर भर देणार असल्याचे कृतीतून स्पष्ट केले आहे. बेलापूर सेक्टर १९, २० व ३० मधील रस्त्यांची कामे करणे प्रस्तावित आहे. या कामांना मंजुरी देण्यापूर्वी आयुक्तांनी अचानक घटनास्थळी भेट देवून दोन्ही रस्त्यांची पाहणी केली. भविष्यातही प्रत्येक फाईल बनविताना अधिकाऱ्यांनी त्या कामांच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करूनच नियोजन करण्यावर भर देण्यात येणार आहे. आयुक्तांनी सेक्टर५०मधील मलनि:सारण केंद्रांना भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. केंद्राचे काम व्यवस्थित सुुरू आहे का याची पाहणी केली. एनएमएमटीच्या सीबीडी बेलापूरमधील नवीन प्रशासकीय भवनला भेट दिली. उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तोट्यातील बसमार्ग बंद करणे, नवीन मार्ग सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
परिवहन उपक्रमाचा तोटा भरून काढण्यासाठी पालिका व एनएमएमटीने संयुक्त जाहिरातधोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपक्रमाची आयटीएस प्रणाली व इतर कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. उपक्रमातील सर्वात चांगली कामगिरी करणारे पहिले दहा चालक, वाहक व कर्तव्यात कसूर करणारे दहा चालक, वाहक यांचा अहवाल तयार करून त्यावर उचित कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.