छान किती दिसते फुलपाखरू!
By admin | Published: June 23, 2015 01:20 AM2015-06-23T01:20:48+5:302015-06-23T01:20:48+5:30
बागेतील रंगीबेरंगी फुलपाखरे सर्वांनाच भुरळ घालतात. जिथे फुलपाखरे असतात, तेथील हवेत प्रदूषण कमी असल्याचेही मानले जाते
मुंबई : बागेतील रंगीबेरंगी फुलपाखरे सर्वांनाच भुरळ घालतात. जिथे फुलपाखरे असतात, तेथील हवेत प्रदूषण कमी असल्याचेही मानले जाते. त्यामुळे निसर्गप्रेमींकडून त्याच्या विविध प्रजाती टिकविण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्याच अनुषंगाने ‘ब्लू मॉरमॉन’ या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. ती सोमवारी शासनाने मान्य केली.
‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. फुलपाखराला असा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियल, राज्य वृक्ष - आंबा आणि राज्य फुल जारुल घोषित करण्यात आलेले आहे. परंतु राज्य फुलपाखरू निर्देशित करण्यात आलेले नव्हते.