भाजपा सरकारच्या काळात देशाची लूट; चार वर्षांत इंधनदर २५ रुपयांनी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:59 AM2018-10-07T05:59:38+5:302018-10-07T05:59:46+5:30
चार वर्षांत राज्यातील आणि देशातील जनतेची भयंकर लूट या दोन्ही सरकारने केली आहे. चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुमारे २५ रु पयांनी वाढ झाली आहे.
नवी मुंबई : चार वर्षांत राज्यातील आणि देशातील जनतेची भयंकर लूट या दोन्ही सरकारने केली आहे. चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सुमारे २५ रु पयांनी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या करातून या सरकारने १५ लाख कोटी रु पयांपेक्षा जास्त रक्कम देशातील सामान्य जनतेच्या खिशातून कमावल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शुक्रवार, ५ आॅक्टोबरला वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई राष्ट्रवादीच्या जिल्हाकार्यकारिणीची बैठकी वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे पाटील यांनी भाजपा सरकारवर केला. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक उभे करण्यासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा राज्याचे मुख्यमंत्री करीत आहेत, म्हणजेच राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे स्पष्ट होत आहे. डॉ. आंबेडकरांची दहा स्मारके उभी करण्याची अर्थव्यवस्थेची ताकद होती; परंतु गेल्या साडेतीन-चार वर्षांत इंदू मिल विषयाबाबत काहीच केले नाही, आता निवडणुका जवळ आल्यावर राज्य गहाण ठेवू; पण आम्ही स्मारक करू, असे म्हणण्याची भाषा म्हणजे स्मारक करण्याचा विचार मनातच नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर दुसऱ्या स्मारकांसाठी वारेमाप पैसा उधळताना राज्य गहाण ठेवण्याची बुद्धी झाली नाही; परंतु महामानवाचे स्मारक उभारताना तिजोरीत खणखणाट आहे, हे कळायला लागले असल्याचे सांगत, भाजपा आणि शिवसेना सरकारची स्मारक उभे करण्याची इच्छाच नव्हती, असा आरोप पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.
एमआयएम आणि भारिप एकत्र आल्याने इतर कोणत्या पक्षाचा फायदा आणि तोटा होणार नसून, समविचारी पक्ष म्हणून भारिप काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आल्यास भाजपाचा तोटा होईल आणि भारिपने काही कारण दाखवून निवडणूक स्वतंत्र लढवली, तर भाजपाचा फायदा होईल, असे भाकीतही पाटील यांनी या वेळी केले. मनसेबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, तसेच संपर्कदेखील केलेला नाही या बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे पाटील यांनी सांगितले.
जर भाजपा आणि शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन पाटील यांनी केले; परंतु असे झाले नाही, तर भाजपाच्या फायद्यासाठी कोण स्वतंत्रपणे उभे राहिले आहेत, याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला पटवून सांगणार असून, राज्यातील जनता तेवढे समजून घेईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षात असल्याने निवडणुकांना सामोरे जाताना या सरकारने काय केले, यापेक्षा आम्ही काय करणार आहोत, हे नागरिकांसमोर मांडणार असल्याचे पाटील म्हणाले. प्रभाव कमी होत असल्याचे लक्षात येत असल्याने भाजपा आणि शिवसेना पक्षांकडून काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगितले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा गट हा आयारामांचा
भाजपाने आयारामांना एकत्रित केले आहे. भाजपामध्ये मुख्यमंत्र्यांचा गट हा आयारामांचा गट असून, भाजपाचे निष्ठावंत मुख्यमंत्र्यांच्या गटात नाहीत. बाहेरून आलेले मुख्यमंत्र्यांच्या गटाचे सामर्थ्यवान प्रतिनिधित्व करीत असून, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मागच्या खुर्चीत बसलेले असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांची हजेरी
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबई जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाºयांची प्रत्येकाच्या नावानिशी हजेरी घेतली, यामध्ये काही पदाधिकारी गैरहजर असल्याचे लक्षात आले. सभागृहात सुरू असलेली हजेरी पाहून उपस्थित पदाधिकाºयांना धडकी भरली होती.