रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 02:45 AM2017-10-23T02:45:15+5:302017-10-23T02:45:29+5:30
जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे.
नवी मुंबई : जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे. अधिकृत प्रवास भाड्याव्यतिरिक्त जादा आकारणी हे एजंट करत आहेत. वास्तविक प्रवाशांकडून घेतले जाणारे तिकिटांचे कमिशन रेल्वे व्यवस्थापनाने देण्याची गरज आहे. प्रवाशांवर पडणारा हा नाहक बोजा रेल्वेने कमी करावा व सिनेमाच्या तिकिटाच्या काळाबाजाराप्रमाणे प्रवासी तिकिटांचा चाललेला हा काळाबाजार त्वरित थांबवावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.
हार्बर मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक रेल्वेस्थानकावर चारहून अधिक तिकीटघरे आहेत, तरीही या तिकीट खिडक्यांवर प्रचंड गर्दी असते. एटीव्हीएम मशिन, कूपनची सोय केली आणि मासिक पासधारक असले तरीही शेकडो प्रवासी दैनंदिन तिकीट खरेदी करत असतात. त्यांना वेळेत तिकीट मिळाले नाही, तर त्यांची नियमित गाडी चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनावरचा तिकीटविक्रीचा वाढता बोजा कमी करण्यासाठी रेल्वेने खासगी एजंटांची स्टेशन परिसरात नेमणूक केलेली आहे. जुईनगर, वाशी, सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात अनेक एजंट संगणक घेऊन तिकीट विक्री करत असतात. या एजंटांकडेही भरपूर गर्दी होत असते; परंतु प्रत्येक तिकिटामागे हे एजंट १ ते २ रुपये जादा आकारणी करतात. त्यापैकी काही स्थानकांवरील आकारणी अधिकृत नाही. त्यामुळे रेल्वेने एक तर या एजंटना कमिशन वाढवून द्यावे, नाही तर आपल्या आवारात अतिरिक्त खिडक्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या एजंटमुळे रेल्वेच्या कर्मचाºयांचा पगार, खिडकीची व्यवस्था आदी खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांनी त्या खर्चाचा विचार करता एजंटला योग्य कमिशन दिले, तर प्रवाशांकडून होणारी अनधिकृत लूट थांबेल.
प्रत्येक तिकिटामागे २ ते ५ रुपये कमिशन हे एजंट घेतात. अगदी ५ रुपयांचे तिकीट काढायचे असेल तरी हे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांना बसणारा हा नाहक भुर्दंड कमी करावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. या रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या एजंटने आपल्या फलकावरही १ रुपया सर्व्हिस चार्ज लागेल, असे लिहिले आहे. रिटन तिकीटला २ रुपये द्यावे लागतील, असे लिहिले आहे; परंतु सरसकट प्रत्येक तिकिटामागे हे एजंट ५ रुपये घेतात. रेल्वेने या एजंटना योग्य कमिशन देऊन प्रवाशांवर पडणारा अतिरिक्त बोजा कमी करावा. तिकीट खिडकी बंद जुईनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट खिडक्या बंद असून, या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेस्थानकातील तिकीट खिडकी बंद असल्याने प्रवाशांना एजंटकडून तिकीट खरेदी करावे लागत असल्याची तक्रारदेखील प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना पश्चिमेकडील तिकीट खिडकीचा वापर करावा लागतो.