स्टील मार्केटवरील भार घटणार
By Admin | Published: July 13, 2015 02:59 AM2015-07-13T02:59:06+5:302015-07-13T02:59:06+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार
कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या कळंबोलीत लोखंड-पोलाद बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याकरिता लोह-पोलाद बाजार समितीनेसुध्दा सकारात्मक भूमिका घेतली आहे. वाहतुकीत जाणारा वेळ त्याचबरोबर व्यापारी व ग्राहकांची सोय व्हावी याकरिता दोन ते तीन ठिकाणी यार्ड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली तर कळंबोलीवरील भार कमी होईल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहर विकसित करण्याबरोबरच शासनाने त्या ठिकाणचा लोखंड- पोलाद बाजार कळंबोली येथे हलवला. येथील ३०२ हेक्टर जमिनीवर १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले. १९८० मध्ये सिडकोने भाडे करार करून लीज तत्त्वावर हे भूखंड व्यापाऱ्यांना दिले. अतिशय विस्तीर्ण असलेल्या या बाजारात टाटा स्टील कंपनी, स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया, राष्ट्रीय पार्कनिगम या मोठ्या वखारी आहेत. त्याचबरोबर लोह -पोलादाची मोठमोठी गोदामे असून या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात लोह-पोलाद येते आणि जाते. महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रक आणि कंटेनर स्टील मार्केटमध्ये लोखंडाची ने-आण करण्याकरिता फेऱ्या मारतात. हजारो वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. देशभरात त्याचबरोबर बाहेरच्या देशातही याच बाजारपेठेतून लोह-पोलादाचा व्यापार होतो. जेएनपीटी बंदरातूनही कळंबोलीतील लोखंड व्यापारी आयात-निर्यात करतात.
उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यातून ये -जा करणाऱ्या वाहनांना मालाची चढ -उतार करण्याकरिता आजच्या घडीला कळंबोली गाठावी लागते. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांची गर्दी होते. विशेषत: मुंब्रा, मुंबई-गोवा व जेएनपीटी मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात घडतात. या व्यतिरिक्त कळंबोली बाजारातही अवजड वाहनांची गर्दी असल्याने लोडिंग- अनलोडिंगला विलंब लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून बाजार समितीने कळंबोली स्टील मार्केटचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अद्याप प्राथमिक टप्प्यात असला तरी त्यादृष्टीने बाजार समिती सकारात्मक असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम इंदलकर यांनी दिली. याबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली असून समितीच्या संचालकांनी काही सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)