बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 10:58 AM2021-09-07T10:58:55+5:302021-09-07T10:59:25+5:30
टोमॅटोला ७ ते १० रुपये भाव : शेवगासह कोबीचे दरही घसरले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो ७ ते १० रुपये, कोबी ८ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
श्रावण सुरू झाल्यापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची प्रचंड आवक होत आहे. सोमवारी ६४८ वाहनांंमधून तब्बल ३७१५ टन भाजीपाल्याची व ६ लाख ६६ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली; परंतु ग्राहकांचे प्रमाण कमी असल्यामुळे दर घसरले. कोथिंबीर व इतर अनेक भाज्या मोठ्या प्रमाणात फेकून द्याव्या लागल्या. लिंबू, भेंडी, फ्लॉवर, कारली, कोबी, ढब्बू मिर्ची, शेवगा शेंग, टोमॅटो, वांगी, कांदापात, कोथिंबीर या सर्वांचे दर घसरले आहेत.
पुणे व इतर बाजार समित्यांमध्ये बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी मुंबईला भाजीपाला पाठवत आहेत; परंतु येथेही दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गणेश उत्सवापर्यंत अशीच स्थिती राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
होलसेल मार्केटमधील तुलनात्मक बाजारभाव
वस्तू ६ ऑगस्ट ६ सप्टेंबर
भेंडी २० ते ३६ १४ ते २२
दुधी भोपळा १४ ते २० १२ ते १८
फरसबी ४० ते ७० २५ ते ३५
कोबी १० ते २० ८ ते १०
ढोबळी मिर्ची २० ते २८ १० ते १६
शेवगा शेंग ३० ते ४० १० ते १६
टाेमॅटो १० ते १६ ७ ते १०