खार जमीन संशोधन केंद्रात लाखोंचे नुकसान; पाच हेक्टरवरील भात रोपांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:01 AM2019-08-06T01:01:51+5:302019-08-06T01:01:55+5:30
गोदामातील ८ टन खत भिजले; विविध प्रजातीचे २ टन मासेही गेले वाहून
- वैभव गायकर
पनवेल : रायगड जिल्ह्यात पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे एकमेव संशोधन केंद्र आहे. अतिवृष्टीमुळे केंद्रातील भाताची रोपं, विविध प्रजातीची मत्सबीजे, विक्री योग्य मासे आदींसह कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा २० लाखांच्या घरात गेला आहे.
गेल्या दोन दिवसांत पनवेल तालुक्यात साधारण ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागासह पनवेल शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गाढी नदी किनारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
शहरातील बंदर रोडवर असलेल्या खार जमीन संशोधन केंद्रातही पाणी साचल्याने संशोधन केंद्राचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५ हेक्टर परिसरातील भाताची रोपे वाहून गेली, तसेच या ठिकाणी तयार करण्यात येणारे युरिया(डीएपी) हे गोदामात साठविलेले ८ टन खतदेखील पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील खार जमीन शास्त्रज्ञांनी दिली. या व्यतिरिक्त केंद्रातील महत्त्वाचे रेकॉर्ड असलेले कागदपत्रे भिजली आहेत.
संशोधन केंद्रात मत्सबीजांवर प्रक्रिया करून विक्री केली जाते. खार जमीन संशोधन केंद्रातील सुमारे दहा लाखांची मत्सबीजे वाहून गेली आहेत, तसेच रोहा, कटला, थीलापिया, जिताडा या वेगवेगळ्या प्रजातीचे विक्रीयोग्य दोन टन मासेदेखील वाहून गेल्याची माहिती खार जमीन शास्त्रज्ञ डॉ एस. बी. धोडके यांनी दिली. पाणीउपसा करणारा पंपही पाण्याखाली गेल्याने केंद्रात साचलेले पाणी काढण्यात अडथळा निर्माण झाला होता.
पनवेलमध्ये १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर, १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण ‘खार जमीन संशोधन केंद्र’ असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. मात्र, पारगाव येथील जमीन विमानतळासाठी संपादित झाल्याने खार जमीन क्षेत्राची जागा कमी होत आहे. विशेष म्हणजे, २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेदेखील केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या केंद्राचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
खार जमीन संशोधन केंद्रात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पनवेल तहसीलदारांना पत्र लिहिले आहे, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठालादेखील या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.
- डॉ. एस. बी. धोडके, खार जमीन शास्त्रज्ञ.
केंद्राला पुराचा धोका
गाढी नदीचे पाणी पनवेल खाडीत जाते, त्या किनाऱ्यालगत खार जमीन संशोधन केंद्र आहे. विमानतळाच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी साठणारे ठिकाण संकुचित झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे भविष्यात संशोधन केंद्राला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.