मधुकर ठाकूर
उरण : सिडकोने बांधलेल्या साकवामध्ये अडकत असलेल्या केरकचऱ्यामुळे शेतीतील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे चाणजे येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून येथील शेतकरी व ग्रामस्थांमधून सिडको विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सिडकोने शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी करून साकवाखाली जमा झालेला गाळ, केर कचऱा काढून शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशीही मागणी चाणजे येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सिडकोकडे केली आहे.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी सेक्टर ५९ येथील जागेत सिडकोने साकव बांधला आहे. या साकवामध्ये कचऱ्याच्या गाळ बसत असल्यामुळे साकवाच्या खालून पाण्याच्या प्रवाहाचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही.त्यामुळे चाणजे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले असून येथील भात शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्यामुळे आत्ताच पेरणी केलेले भाताचे बियाणे आणि काही ठिकाणी उगवलेली भाताची कोवळी रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. शिवाय येथील विहिरीमध्ये खारे पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र सिडकोचे अधिकारी या गंभीर बाबीकडे कानाडोळा करीत आहेत.
अजूनही सिडकोचे अधिकारी या सांडपाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी येथे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या नुकसानाची पाहणी करावी आणि साकवाच्या खाली साचलेला व बसलेला केरकचऱ्याचा गाळ ताबडतोब काढून टाकून साकव खालून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग खुला करावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सिडकोकडे केली आहे.