आठ महिन्यांत दहा कोटींचे नुकसान; नवी मुंबईतील बँड, बँजो पथकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:34 PM2020-11-10T23:34:54+5:302020-11-10T23:35:03+5:30

वाजंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Loss of Rs 10 crore in eight months | आठ महिन्यांत दहा कोटींचे नुकसान; नवी मुंबईतील बँड, बँजो पथकांवर उपासमारीची वेळ

आठ महिन्यांत दहा कोटींचे नुकसान; नवी मुंबईतील बँड, बँजो पथकांवर उपासमारीची वेळ

Next

नवी मुंबई : जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक गोष्टींना आळा बसला आहे. लग्न, उत्सव, वाढदिवस, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांना वाद्य वाजविण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्यामुळे नवी मुंबईतील २३ बँड पथक आणि ७० बँजो पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांचे आठ ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दिवाळे कोळीवाडा– ३, शिरवणे-२, घणसोली-२, कोपरखैरणे-२, गोठीवली-२, दिवा कोळीवाडा-१, खैरणे बोनकोडे-१, सानपाडा-१, वाशी गाव-१, सारसोळे-१, कुकशेत-१, जुईनगर-१, करावे गाव-१, बेलापूर गाव-२ आणि तुर्भे गाव-१ असे नवी मुंबईत एकूण २३ बँड पथक आहेत, तर ७० पेक्षा अधिक बँजो पथके आहेत. गेल्या आठ महिन्यांत झालेल्या नुकसानीमुळे बँड पथकाने सरकारच्या नियमावलीन्वये वाद्य वाजविण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. सरकारने नियमावली तयार करून, त्यानुसार ब्रंड वाद्य वाजविण्यास वेळ ठरवून परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. विवाह सोहळे सुरू व्हावे, रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे मिळतील, अशी आशा या वाजंत्री कलावंताना लागली आहे.

नवी मुंबईत प्रत्येक बँड पथकात २० ते २६ कलावंत आहेत. या पथकांतील ६०० वाजंत्री कलावंतांवर दोन ते अडीच हजार कुटुंबे विसंबून आहेत. उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने वाजंत्री कलाकारांची विवंचना होत आहे. तरी शासनाने बँड, बँजो कलाकारांना वाजविण्याची परवानगी देऊन उपासमार थांबवावी, अशी मागणी नवी मुंबई सामाजिक सांस्कृतिक कला प्रतिष्ठाल या वाद्य कलावंतांच्या नोंदणीकृत संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन सिंह, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.
 

Web Title: Loss of Rs 10 crore in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.