नेटवर्क नसल्याने बोर्लीपंचतन, वडवली परिसरात विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:41 AM2020-11-26T00:41:09+5:302020-11-26T00:41:19+5:30
आयडिया, व्होडाफोनविरोधात संताप
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये मोबाइल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कित्येक महिन्यांपासून अधिकाऱ्यांना सांगूनदेखील कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दोन वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र, मोबाइल नेटवर्क सुरळीत नसल्याने तालुक्यातील तरुणांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेटवर्क सुविधा सुरळीत मिळावी, त्याबाबतचे पत्र थेट व्होडाफोन व आयडियाच्या पुणे कार्यालयाला धाडले होते. श्रीवर्धन तालुक्यातील बहुतेक पक्ष आपापल्या परीने नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोबाइल कंपन्या त्यांनाही जुमानत नसल्याचे दिसते. बोर्लीपंचतनमधील अनेक मोबाइल ग्राहकांकडून एकत्र येऊन पत्र देण्यात आले होते. यापुढे जर कॉल व इंटरनेट सेवा सुधारली गेली नाही तर हजारो तरुण थेट मोबाइल टॉवरवर जाऊन पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
दिवेआगर, बोर्ली, वेळास तसेच शिस्ते, वडवली यांसह इतरही अनेक छोट्या-मोठ्या खेडेगावांना व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल, जिओ या कंपन्या मोबाइल नेटवर्क सेवा देत आहेत. सर्व कंपन्यांचे मिळत असलेले नेटवर्क सुमार दर्जाचे असून अनेक वेळा प्रयत्न करूनही कॉल न लागणे, वारंवार खंडित होणारे नेटवर्क, इंटरनेट सेवादेखील व्यवस्थित नसल्याने कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणामध्येदेखील खोडा बसत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
जॉब जाण्याची भीती
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातील उच्चशिक्षित हे ऑफिस बंद असल्याने गावाहून ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. मात्र गावी वारंवार खंडित होणारे नेटवर्क पाहता आता थेट नेटवर्क नसल्याने नोकरी गमवावी लागण्याची शक्यता बोलली जात आहे.
बोर्लीपंचतन परिसरात मुख्य समस्या म्हणजे नेटवर्क व्यवस्था. एवढा पाठपुरावा करून नेटवर्कची समस्या तशीच आहे. नेटवर्क कंपनीकडून आमची वेळोवेळी समजूत घातली जात आहे. तरी पुन्हा एकदा अंदोलन करावे लागेल असे चित्र येथे तयार होत आहे.
- श्रीप्रसाद तोंडलेकर, व्होडाफोन ग्राहक
फोन न लागणे, रेंज न मिळणे. इंटरनेट स्पीड नसणे. दुसऱ्या व्यक्तीला नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगणे असा त्रास सातत्याने होत असतो. यामध्ये आयडिया, व्होडाफोन,यांच्यासह सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलचासुद्धा सहभाग आहे. - मयूर परकर, आयडिया ग्राहक