नवी मुंबई : अगोदरच तोट्यात असलेल्या एनएमएमटीला फुकट्या प्रवाशांमुळेही घाटा बसू लागला आहे. अशा फुकट्यांना आळा घालण्याच्या प्रयत्नात मागील दोन वर्षांत ७,८८० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे; परंतु सततच्या कारवाईनंतरही फुकट्या प्रवाशांची संख्या घटत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेने शहरवासीयांच्या सोयीसाठी सुरू केलेला परिवहन उपक्रम सुरुवातीपासूनच तोट्यात आहे; परंतु प्रवाशांची सोय म्हणून ही सार्वजनिक दळणवळण व्यवस्था टिकवून ठेवण्यात आली आहे. अशातच परिवहनच्या तोट्यात भर टाकण्याचे काम फुकट्या प्रवाशांकडून केले जात आहे. त्यामुळे उपक्रम अधिकच घाट्यात चालल्याचे दिसून येत आहे. अशा फुकट्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी परिवहनकडून विविध मार्गांवर तिकीट तपासणीसांद्वारे मोहीम राबवली जाते. मागील दोन वर्षांत ७,८८० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१८ मध्ये ३,८१३ प्रवाशांकडून पाच लाख ६६ हजार ७८३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गतवर्षात ४,०६१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून पाच लाख ९४ हजार २०९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील गर्दीच्या मार्गावर तसेच शहराबाहेर जाणाऱ्या काही मार्गावर हे प्रवासी आढळून आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास केला जातो. अनेकदा वाहकाने प्रवाशाकडे तिकिटाबाबत चौकशी केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अशा वेळी वाहकाने वाद घातल्यास त्यांनाच फुकट्या प्रवाशांच्या दमदाटीलाही सामोरे जावे लागते. त्यामध्ये महाविद्यालयीन तरुणांचाही सर्वाधिक सहभाग दिसून येत आहे. तर वर्षभर करण्यात आलेल्या कारवार्इंमध्ये मार्च, एप्रिल व आॅगस्ट ते डिसेंबर दरम्यान सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत.