मुंबई बाजार समितीत कांदा सडल्याने नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:51 AM2018-12-05T05:51:30+5:302018-12-05T05:51:37+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. मागणीपेक्षा जास्त माल विक्रीसाठी येत असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. विक्री न झालेला माल सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.
बाजार समितीमध्ये मंगळवारी ६५ ट्रक व ६७ टेंपोमधून तब्बल १३८६ टन कांदा विक्रीसाठी आला आहे. सोमवारीही ११३६ टन आवक झाली होती. एक आठवड्यापासून मार्केटमध्ये आवक वाढली असल्यामुळे बाजारभाव प्रचंड घसरू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जुन्या कांद्याला फक्त ४ ते ८ रुपये व नवीन कांदा १० ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. एप्रिल व मेमध्ये कांद्याला १० ते १२ रुपये दर मिळत होता. दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल या अपेक्षेने व जादा पीक असलेल्या शेतकºयांनी कांदा चाळींमध्ये साठवला होता. परंतु बाजारभाव पडल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये लिलावगृहासह सर्व गाळ्यांमध्ये विक्री न झालेल्या कांद्याची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. यामधील बहुतांश माल सडू लागला आहे. लिलावगृहामध्ये मंगळवारी १०० पेक्षा जास्त गोणी सडल्या असून तो माल फेकून द्यावा लागला आहे. विक्रीसाठी पाठविलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक अचानक वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरले असल्याची प्रतिक्रिया व्यापाºयांनी दिली असून पुढील काही दिवस अशीच स्थिती राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.
>बटाटा दर घसरले
मार्केटमध्ये ६५ ट्रक व
१३ टेम्पोंमधून तब्बल १४२० टन बटाटा विक्रीसाठी आला आहे.
उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधून माल विक्रीसाठी आला आहे. ६ ते १७ रुपये किलो दराने होलसेल मार्केटमध्ये विक्री होऊ लागली आहे. बटाट्याचीही विक्री न झाल्यामुळे माल खराब होऊ लागला आहे.