नवी मुंबई : शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी संक्रमण शिबिरे बांधण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव मंगळवारच्या स्थगित सर्वसाधारण सभेत बहुमताने फेटाळण्यात आला. काँग्रेसने या ठरावाचे समर्थन केले. झोपडपट्टी व गावठाणाच्या भविष्यकालीन पुनर्विकासाच्या दृष्टीने संक्रमण शिबिरे उभारताना नियोजन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. असे असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या सदस्यांनी या ठरावाला विरोध दर्शवित बहुमताने तो फेटाळून लावला.नवी मुंबईतील सिडकोनिर्मित इमारतींची दुरवस्था झाली आहे. मागील वीस वर्षांपासून येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. महापालिकेने सुमारे ४५0 इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. यात ५८ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या इमारतींची पुनर्बांधणी गरजेची झाली आहे. या इमारतींची पुनर्बांधणी करताना तेथील रहिवाशांसाठी अन्य ठिकाणी निवासाची सोय करणे गरजेचे आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महापालिका व सिडकोच्या मोकळ्या जागेवर संक्रमण शिबिर उभारण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेत आणला होता. या प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादीच्या दिव्या गायकवाड यांनी संक्रमण शिबिराचा प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने आणल्याचे स्पष्ट केले. यात गरीब जनतेचा विचार न करता विकासकांना अधिक प्राधान्य दिल्याचा आरोप करीत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे अशा प्रकारचा ठराव आणण्याचे अधिकार आयुक्तांना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिव्या गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे रवींद्र इथापे, सुधाकर सोनावणे व अनंत सुतार यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला. तर भाजपाचे रामचंद्र घरत यांनी मोकळी मैदाने आणि उद्यानाच्या जागेवर संक्रमण शिबिरे उभारण्यास विरोध दर्शविला.एमआयडीसीतील मोकळ्या जागांवर संक्रमण शिबिरे उभारण्याची सूचना त्यांनी केली. त्यावर शिवसेनेचे किशोर पाटकर यांनी आक्षेप घेतला. काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र या ठरावाला समर्थन देत आयुक्तांचे अभिनंदन केले. मोडकळीस आलेल्या इमारतीतून जीव मुठीत घेऊन जगणाºया हजारो रहिवाशांना दिलासा देणाºया या ठरावाला विरोध करणाºयांचा हेतू स्पष्ट होतो. या प्रस्तावाला विरोध करणाºयांच्या निषेधार्थ शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिला. तसेच वेळप्रसंगी मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना घेऊन सत्ताधाºयांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशाराही चौगुले यांनी या वेळी दिला. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादीने आयुक्तांचा हा प्रस्ताव बहुमताने फेटाळून लावला. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सत्ताधाºयांच्या या कृतीचा तीव्र निषेध केला.>महापौर जयवंत सुतार यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून विरोधकांनी पाण्याच्या बाटल्या आणि कागद फाडून महापौरांच्या कृत्याचा निषेध केला.> सभागृहात महापौर गैरहजर असताना सभागृह नेते रवींद्र इथापे हे सभा चालविण्यासाठी महापौरांच्या खुर्चीवर जावून बसले. त्यांनी त्यासाठी सभागृहाची परवानगी घेतली नाही. त्याला माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्याने अखेर इथापे यांनी दिलगिरी व्यक्त करीत सभागृहाचे काम सुरू केले.
संक्रमण शिबिराला सत्ताधाऱ्यांचा खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 3:08 AM