नवी मुंबई : शहरवासीयांची सध्या ‘धूम’ स्टाईल दुचाकीस्वारांनी डोकेदुखी वाढविली आहे. वाहतुकीची पर्वा न करता कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न वाजवित सुसाट जाणाऱ्या अशा बेफिकीर दुचाकीस्वारांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. असे असले तरी मास्क लावणे, शारीरिक आंतर राखणे आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करणे बंधनकारक आहे. परंतु आठ महिन्यांच्या बंदीनंतर वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, घणसोली तसेच पामबीच मार्गावर या तरुणांच्या जीवघेण्या कसरती सुरू झाल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी वॉकला जाणाऱ्या नागरिकांना या धूम स्टाईल मोटारचालकांचा उपद्रव होत आहे. तसेच कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. वाशी येथील मिनी सिशोअर, कोपरखैरणेत भूमिपूत्र मैदान ते नवीन तलाव या दरम्यानचा रस्ता, घणसोली पामबीच मार्ग आदी ठिकाणी सुसाट वाहने चालविण्याच्या कसरती पाहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे या धूम स्टाईल दुचाकीस्वारांनी आता वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरसुद्धा आपल्या कसरती सुरू केल्या आहेत. वाहतूक पोलिसांनी तातडीने अशा दुचाकीस्वारांना अटकाव करावा, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.
पामबीच मार्गावर दुचाकीस्वारांची झडाझडतीनवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या रविवारी पामबीच मार्गावर विशेष मोहीम राबविली. याअंतर्गत सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज करीत भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलींवर दंडात्मक कारवाई केली. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांनासुद्धा कायद्याचा बडगा दाखविण्यात आला. या मोहिमेअंतर्गत सुमारे ४० दुचाकींची तपासणी करण्यात आली. अशीच मोहीम शहराच्या अन्य भागांतही राबवावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे केली जात आहे.