धान्यसह मसाल्याची आवक कमीच; वाटाणा, टोमॅटो कोबीच्या दरात वाढ
By नामदेव मोरे | Published: January 3, 2024 05:42 PM2024-01-03T17:42:46+5:302024-01-03T17:43:53+5:30
कांद्याची आवक सुरळीत, बटाटा लसूणची आवक घटली.
नामदेव मोरे, नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपाचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकवर सुरूच आहे. बुधवार धान्यसह मसाल्यांची आवक कमी झाली आहे. कांद्याची आवक सुरळीत असली तरी बटाटा व लसूणची मंदावली आहे. धान्य व मसाल्याच्या दरामध्ये फार परिणाम झालेला नाही पण वाटाणा, टोमॅटो, कोबीसह काही भाज्यांच्या दरामध्ये वृद्धी झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून धान्य व मसाल्याच्या पदार्थांची आवक होते. वाहतूकदारांच्या संपामुळे दोन दिवसांपासून आवक कमी होऊ लागली आहे. धान्य मार्केटमध्ये सोमवारी २३९ वाहनांची आवक झाली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत १३९ वाहनांची आवक झाली होती. मसाला मार्केटमध्ये दुपारी दोन पर्यंत ८० वाहनांचीच आवक झाली होती. फळ मार्केटची आवकही निम्यावर आली आहे. कांदा आवक सुरळीत झाली असून दिवसभरात १०९३ टन आवक झाली आहे. बटाट्याची फक्त ५३९ व लसूणची १० टनच आवक झाली आहे.
भाजीपाला मार्केटमध्ये दिवसभरात ५४७ वाहनांची आवक झाली आहे. आवक समाधानकारक असली तरी काही वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसामध्ये हिरवा वाटाणा प्रतीकिलो २५ ते ३५ वरून ४५ ते ५५ रुपयांवर गेला आहे. टोमॅटो १२ ते २८ वरून १५ ते ३३, ढोबळी मिर्ची ३२ ते ५२ वरून ४५ ते ५५ वर पोहचली आहे. कोबीचे दर दोन दिवसामध्ये ९ ते १३ रुपये किलोवरून १४ ते २४ रुपयांवर पोहचले आहेत. गुरूवारी बहुतांश सर्व मार्केटमधील आवक सुरळीत होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
भाजीपाला मार्केटमधील दोन दिवसातील फरक :
वस्तू - १ जानेवारी - ३ जानेवारी
दुधी भोपळा - २० ते २२ - २४ ते ३२
घेवडा ४२ ते ४८ - ५० ते ६०
कोबी ९ ते १३ - १४ ते २४
ढोबळी मिर्ची ३२ ते ५२ - ४५ ते ५५
शिराळी दोडका - ३५ ते ४५ - ४० ते ५०
टोमॅटो १२ ते २८ - १५ ते ३२
मिर्ची २६ ते ७५ - ३५ ते ८०