मदयधुंद तरुणांकडून पोलिसांना मारहाण
By admin | Published: September 26, 2016 02:25 AM2016-09-26T02:25:30+5:302016-09-26T02:25:30+5:30
नाकाबंदीत चौकशीसाठी थांबवल्यामुळे तिघा मद्यधुंद तरुणांनी पोलिसांसह नागरिकांना मारहाण केल्याची घटना सानपाडा येथे घडली.
नवी मुंबई : नाकाबंदीत चौकशीसाठी थांबवल्यामुळे तिघा मद्यधुंद तरुणांनी पोलिसांसह नागरिकांना मारहाण केल्याची घटना सानपाडा येथे घडली. वाहनाची कागदपत्रे न दाखवता पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनी हा प्रकार केला. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
उरण येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून ठिकठिकाणी नाकाबंदी देखील सुरू आहे. यानुसार शुक्रवारी संध्याकाळी सानपाडा पोलिसांतर्फे सुरू असलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. नाकाबंदीच्या मार्गावरून तिघे जण स्कुटीवरून जात असताना, त्याठिकाणचे वाहतूक पोलीस कुमार चंदनशिवे यांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले. यावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी पोलिसांना चौकशीत सहकार्य न करता ओळखीच्या व्यक्तींचे वशिले सांगण्याला सुरवात केली. यावरून चंदनशिवे यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. त्यामुळे सानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी अरुण वाडेकर हे देखील त्याठिकाणी आले.
काही केल्या पोलीस सोडत नसल्यामुळे त्या तिघांनी अखेरीस बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याला सुरवात केली. याचवेळी त्याठिकाणावरून चाललेल्या विशाल अगरवाल यांनी मोबाइलमधून या प्रकाराचे चित्रीकरण करण्याला सुरवात केली. त्याचा राग आल्यामुळे तिघा तरुणांनी त्यांनाही मारहाण केली. अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या इतर पोलीस व नागरिकांनी त्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रजोत मोसमकर (२८), विशाल माने (२७), तेजस जगताप (२२) अशी त्यांची नावे असून प्रजोत व विशाल हे सानपाडाचे तर तेजस हा पनवेलचा राहणारा आहे. हे तिघेही वाशीत मद्यपान केल्यानंतर स्कुटीवरून (एमएच ४३ एव्ही ६१०५) सानपाडा येथे चालले होते. यादरम्यान मोराज चौकालगत नाकाबंदीत त्यांनी हा प्रकार केला. त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.