बोर्लीपंचतन : दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथे राहणारे हरिश्चंद्र शिलकर (४१) यांचे व त्याचा काका मदन शिलकर (६१) यांच्यात घरगुती किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये काकाने पुतण्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. यामध्ये हरिश्चंद्र जबर जखमी झाले असून, मदन यास पोलिसांनी अटक केली आहे.
गोंडघर गावामध्ये राहणारे धोंडू सुंदर शिलकर यांनी दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा हरिश्चंद्र शिलकर व त्यांचा भाऊ मदन यांच्यामध्ये दुपारी १२.३० च्या दरम्यान जेवण करण्यावरून किरकोळ वाद झाला, यामध्ये मदन शिलकर याला राग अनावर झाल्याने घरातील धारदार कोयत्याने हरिश्चंद्रच्या डाव्या कानाजवळ जोरदार वार केला. यामध्ये हरिश्चंद्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडून बेशुद्ध झाला. जखमी अवस्थेमध्ये हरिश्चंद्र यास बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले; परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयामध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले आहे. सध्या जखमी हरिश्चंद्रची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तर हरिश्चंद्र याचा काका मदन यास पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि महेंद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली देवकुळे करीत आहेत.