हत्येचा प्रयत्न करणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:21 AM2019-11-16T00:21:18+5:302019-11-16T00:21:27+5:30
विहीघर येथे एकाच बांधकाम साइटवर काम करणा-या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.
पनवेल : विहीघर येथे एकाच बांधकाम साइटवर काम करणा-या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. सत्येंद्र रामधर चौधरी (२५, अहिरगाव, मध्य प्रदेश) या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील विहीघर येथे मरी आई मंदिराच्या पाठीमागे एका बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू आहे. या ठिकाणी कमलेशकुमार रामेश्वर कोरी (२७, मध्य प्रदेश) व सत्येंद्र रामधर चौधरी हे काम करत आहेत. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून आधी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात ठेवून सत्येंद्र याने कमलेशकुमार याच्या डोक्यावर लाकडी बांबूने मारहाण केली.
कमलेशकुमार जखमी झाल्यानंतर सत्येंद्र तेथून पळून गेला. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येंद्र मध्यप्रदेश येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एच जुईकर, पोलीस हवालदार जयंत यादव, पोलीस नाईक प्रफुल्ल कुकले यांनी मध्यप्रदेश गाठले. आदिवासी भाग असल्याने आरोपीला पकडणे कठीण काम होते. म्हणून खांदेश्वर पोलिसांनी तेथील ठाणा सिव्हिल लाइन सतना (मध्यप्रदेश) स्थानिक पोलिसांची मदत घेतली. व सत्येंद्र रामधर चौधरी याला रात्री अटक केली.
कमलेशकुमार याच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू असून बेशुद्धावस्थेत आहे. तो शुध्दीत येण्याची पोलीस वाट पहात आहेत. या प्रकरणी सत्येंद्रला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.