नवी मुंबई : सचिन तेंडुलकरच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी सीवूडमध्ये भव्य रांगोळी साकारली आहे. शिवणकलेच्या साधनांचा वापर करून ४६ फूट लांब व २४ फूट रुंद रांगोळी काढली असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.नेरुळमध्ये राहणारा अभिषेक साटम हा तरुण सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. त्याने आतापर्यंत सचिन तेंडुलकरची माहिती असणारी पुस्तके व इतर साहित्याचे संकलन केले आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त त्याने यापूर्वीही भव्य पोट्रेट काढले होते. २४ एप्रिलला ४६ व्या वाढदिवसानिमित्तही सीवूडमध्ये रंगरेषा संस्थेच्या सहकार्याने तब्बल ४६ फुटांची रांगोळी काढली आहे. यासाठी शिवणकलेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. तब्बल ८६ हजार बटण, चेन, धाग्यांचे रीळ, कैची, सूट, हँगर, सेफ्टी पीन्स, मोजपट्टी याचा वापर करण्यात आला आहे.दहा जणांच्या टीमने २४ तास अथक परिश्रम करून काढलेली रांगोळी पाहण्यासाठी नवी मुंबईच्या विविध परिसरातून सीवूडमधील मॉलला भेट देत होते. ही रांगोळी साकारण्यासाठी अभिषेक साटम, संदीप बोबडे, किरण सावंत, मिलिंद भुरवणे, चेतन राऊत, आबासाहेब शेवाळे, प्रतीक घुसळे, अक्षय यादव, विभव शेडगे, फॅशन डिझायनर उमंग मेहता, छायाचित्रकार साईश कांबळी यांनी परिश्रम घेतले.
सचिनच्या चाहत्यांनी साकारली भव्य रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:00 AM