एपीएमसी निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 04:23 AM2020-02-27T04:23:42+5:302020-02-27T06:58:45+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना एकत्र; भाजपचे अधिकृत पॅनल नाही

maha vikas aghadi dominates apmc election | एपीएमसी निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचे वर्चस्व

एपीएमसी निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचे वर्चस्व

googlenewsNext

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवत आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने पॅनल तयार केले आहे. भाजपने प्रथमच बाजार समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असले तरी त्यांना अधिकृतपणे पॅनल उभे करता आलेले नाही.

राज्यातील ३०५ बाजार समिती व ६२५ उपमार्केटची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. सहा महसूल विभागांतून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी २९ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. एक व्यापारी व कामगार प्रतिनिधीची बिनविरोध निवड झाली आहे. ४३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बाजार समितीवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रभुत्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे मार्केटवर वर्चस्व राहिले आहे. या वर्षी महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुकीस सामोरी जात आहे. महसूल विभागामधील १२ शेतकरी प्रतिनिधी निवडण्यासाठी पॅनल तयार करण्यात आले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी पाच ठिकाणी व शिवसेना व शेतकरी कामगार पक्ष प्रत्येकी एक जागेवर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कपबशी चिन्ह घेण्यात आले आहे. या वर्षी भारतीय जनता पक्षानेही बाजार समिती निवडणुकीमध्ये लक्ष दिले आहे. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर भाजपची जबाबदारी असल्याचे समजते; परंतु भाजपने अधिकृतपणे पॅनल तयार केलेले नाही.

मुंबई बाजार समितीमध्ये २७ संचालक असतात. त्यापैकी सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी, पाच मार्केटमधील प्रत्येकी एक व्यापारी प्रतिनिधी, एक कामगार प्रतिनिधी अशा १८ जणांची मतदानाने निवड केली जाते. या वर्षीच्या निवडणुकीमध्ये कामगार प्रतिनिधी मतदारसंघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १६ जागांसाठी एकूण ५८ उमदेवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे व पणनमंत्री बाळासाहेब पाटीलही मुंबई बाजार समितीवर महाविकास आघाडीचे पॅनल निवडून यावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने पहिल्यांदा बाजार समिती निवडणुकीत लक्ष दिले आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे-
मतदारसंघ      जागा    उमेदवार
औरंगाबाद        ०२          ११
नागपूर              ०२         ०७
अमरावती         ०२         ०७
पुणे                   ०२         ०५
कोकण             ०२         ०५
नाशिक             ०२         ०८

मतदारसंघ          जागा    उमेदवार
कामगार               ०१      बिनविरोध
फळ मार्केट          ०१      बिनविरोध
कांदा मार्केट         ०१          ०३
भाजी मार्केट         ०१          ०४
धान्य मार्केट          ०१          ०३
मसाला मार्केट      ०१          ०३

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने पॅनल तयार केले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी कपबशी हे चिन्ह घेण्यात आले आहे.
- शशिकांत शिंदे, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: maha vikas aghadi dominates apmc election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.