महाडमध्ये थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्यास सुरुवात; यादीत ३० हजार ग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:33 AM2021-03-12T00:33:22+5:302021-03-12T00:33:35+5:30
महावितरणकडून कारवाई सुरू; ३७० जणांचा वीजपुरवठा खंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वीजबिल थकले होते. सरकारने वारंवार ग्राहकांना दिलासा देण्याचे नेहमी आश्वासन दिले. आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्याने महाड तालुक्यात वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत महाड तालुक्यात ३७० थकीत वीजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्राकडून देण्यात आली.
कोरोना महामारीच्या काळात जवळपास नऊ महिने वीजबिल महावितरणच्या ऑफिसमध्ये भरण्याची प्रक्रिया बंद होती. ऑनलाइन वीजबिल स्वीकारली जात होती. वीजग्राहकांचा समज होता की या काळातील वीजबिल माफ होतील किंवा यामध्ये काहीतरी सूट देण्यात येईल. मात्र असे न होता अचानक ७ ते ८ महिन्यांची बिलं भरमसाठ आली. वीजग्राहकांनी कल्पनाही केली नव्हती एवढी बिलं येतील. दर महिना येणाऱ्या बिलामध्ये दुपटीने वाढ झाली. बिलवाढीची तक्रार संपूर्ण महाराष्ट्रात येऊ लागली. बिल कमी करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या रांगा लागू लागल्या. मात्र कार्यालयामध्ये थातूरमातूर उत्तर देऊन ग्राहकांची समज काढत तुम्हाला बिल भरावी लागतील, असे सांगून परत पाठवले जात होते. आजपर्यंत कोणत्याही थकबाकी वीजग्राहकाला महावितरणच्या कार्यालयामधून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात महावितरणचे वीजबिल बाकी राहिलेली आहे. कोरोना महामारी अगोदर दर महिने येणारे वीजबिल कमी येत होते मग अचानक दुपटीने ही वीजबिल वाढली कशी? याचे उत्तर आजही महावितरणकडे नाही. थोडक्यात पाहिले तर सरकारने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करून वीजग्राहकांवर अन्यायच केला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणने गुरुवारपासून वीजबिल थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे.