महाड : महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या विंचुदंशाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब बनली असून, वाढती उष्णता दिवसेंदिवस ग्रामीण भागातील जनतेच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे सायंकाळच्या सुमारास गारव्यासाठी हे विंचू जमिनीबाहेर पडतात व पादचाऱ्यांना ते दंश करतात. अशा विंचुदंशामुळे अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर बनते, मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात विंचुदंश प्रतिबंधक लस सहज उपलब्ध होत असल्याने दंश झालेल्या रुग्णांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयात ही लस गेल्या काही वर्षांपासून सहज उपलब्ध होत असल्याने विंचुदंश झालेल्या रुग्णांच्या दगावण्याच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याची माहितीही डॉ. बाविस्कर यांनी ‘लोकमत’ला दिलीगेल्या १५-२० दिवसांपासून महाड तालुक्यात वाढणाऱ्या तापमानामुळे तर विंचुदंशाच्या दररोज सरासरी पाच ते सहा रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र त्वरित उपचारामुळे अत्यंत गंभीर अवस्थेतील रुग्णदेखील सुस्थितीत येतील, मात्र विंचुदंशामुळे रुग्ण दगावण्याची घटना क्वचितच घडते. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या दररोज विंचुदंशाचे तीन रुग्ण हमखास येतात. त्यांच्यावर या ठिकाणी योग्य रीतीने उपचार केले जातात. वाळण, बिरवाडी, वरंध, दासगांव विभागातील पोलादपूर तालुक्यातील सवांद, धारवली या परिसरातील देखील विंचुदंश झालेल्या रुग्णांवर बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जातात, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ई. सी. बिरादार यांनी दिली.आॅक्टोबरसह मे महिन्यात महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात विंचुदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात. मात्र अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन विंचुदंश संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी केले आहे. विंचुदंश प्रभावी अशी हाफकिनची लस केवळ शासकीय रुग्णालयातच सहज उपलब्ध असते. (वार्ताहर)
महाड तालुक्यात विंचुदंशाने दगावण्याच्या प्रमाणात घट
By admin | Published: May 10, 2016 2:07 AM