नवी मुंबई : उरण व सी लिंक परिसरात प्लॉट, घरे देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या महालँड कंपनीच्या प्रमुखाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यांनतर मागील पाच महिन्यांपासून पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे.
महालँड कंपनीच्या माध्यमातून ५० हुन अधिकांची फसवणूक झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. कंपनीचा प्रमुख पंडित धावजी राठोड याने २०१५ मध्ये मेट्रोसिटी कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांकडून प्लॉट, घरे यासाठी पैसे घेतले होते. त्यानंतर त्याने कंपनीचे विभाजन करून स्वतःची महालँड कंपनी सुरु केली होती. त्याने केलेल्या जाहिरातबाजीला भुलून अनेकांनी सी लिंक परिसरात घरे, प्लॉट घेण्यासाठी बुकिंगसाठी ७ ते १० लाख रुपये दिले होते. मात्र एक वर्षात ताबा देणार सांगूनही पाच वर्ष उलटूनही त्याने घरांचा ताबा दिला नव्हता. यामुळे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधितांनी मनसेकडे तसेच पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु गुन्हा दाखल होत नसल्याने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांचीही भेट घेतली होती.
अखेर मे महिन्यात याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेने तपासला सुरवात केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच पंडित राठोड याने धूम ठोकली होती. तेंव्हापासून पोलिस त्याच्या मागावर असताना मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत अधिक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी इतरही काही कंपन्या व दलाल यांची मदत घेतल्याची शक्यता आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा कक्ष एक अधिक तपास करत आहे.