महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे निधन
By नामदेव मोरे | Published: March 4, 2023 12:20 PM2023-03-04T12:20:39+5:302023-03-04T12:22:11+5:30
गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी मानवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले
नवी मुंबई - परम शांतीधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरीजी महाराज यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सातारामधील जावली तालुक्यातील कापसेवाडी येथे रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गगनगिरी महाराजांचे शिष्य असलेल्या आबानंदगिरी महाराजांनी मानवतेची सेवा करण्यास प्राधान्य दिले. तळोजा मध्ये परम शांतीधाम वृद्धाश्रमाची स्थापना केली. आश्रमात निराधार वृद्धांची मृत्यूपर्यंत मोफत सेवा केली जाते. आतापर्यंत 1150 वृद्धांना आश्रमात आधार देण्यात आला आहे. कापसेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथे महंत आबानंदगिरी चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून महायोगी गगनगिरी वसतीगृह व माध्यमिक विद्यालय चालविले जाते. येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते.
आबानंदगिरी महाराज श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रिय होते. त्यांचा राज्यभर शिष्यपरिवार आहे. आखाडा परंपरेप्रमाणे त्यांचा समाधी सोहळा रविवार 5 मार्च ला शिवदत्त मठ कापसेवाडी, तालुका जावली जिल्हा सातारा येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे.